मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात कायदा व सुव्यवस्थेकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात चार महिन्यांमध्ये 19 हजार 553 महिला बेपत्ता

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात कायदा व सुव्यवस्थेकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात चार महिन्यांमध्ये 19 हजार 553 महिला बेपत्ता झाल्या आहेत, याचे रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे, यासंदर्भात अनिल देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारला होता. केवळ 1 जानेवारी ते 1 मेपर्यंत 19 हजारापेक्षा महिला बेपत्ता असतांना, आम्ही गप्प बसायचे का ? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, राज्यातील महिलांची स्थिती अशी असेल तर अवघड आहे. 18 वर्षा खालील 1453 मुली आहेत आणि उर्वरित महिला आहेत. हे सरकारने लेखी उत्तर दिले आहे. आपण अशा प्रश्नांवर गप्प बसायचे का? पवार म्हणाले, आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला. आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत, ही जमेची एका बाजूला परिस्थितीत आहे. दुसरीकडे मणिपूर सारखी घटना समोर येते. त्यामुळे अपल्याला जागृत राहावे लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठे घडला तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हवे, असे आवाहनही शरद पवारांनी यावेळी केले. तसेच आता शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांनी विरोध असताना शाळा काढली आणि आता शाळा बंद करणे योग्य नाही. असे होतं असताना तुम्ही शांत बसत असाल तर हे योग्य नाही. ते म्हणाले, सरकारी नोकरी कमतरता आहे. एका बाजूला नोकर्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत. यातच सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत, हे योग्य नाही. पवार म्हणाले, सरकारी नोकरीमुळे कुटुंबात स्वास्थ्य असते. परंतु कंत्राटी पदावर नेमले तर तिथे आरक्षण नाही, त्यामुळे मला खात्री आहे, तिथे महिलाना संधी मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतराव लागेल, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.
अजित पवार गटाचे परतीचे दोर केव्हाच कापले ः जयंत पाटील – भविष्यात अजित पवार गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येतील असा विश्वास अनेकांना वाटत असला तरी, अजित पवार गटाचे परतीचे दोर केव्हाच कापण्यात आल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच पुढील काळात ते कधीही एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा केवळ सर्वसामान्यांमध्येच नाही, तर अगदी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांमध्ये असते, मात्र ते कदापी शक्य नाही. आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ही शक्कल आहे. आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबुज केली जात आहे. शरद पवार आपला पक्ष वाचवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात. यात सगळेच आले. कार्यकर्त्यांना यावरून काय प्रकार सुरू आहे हे सगळे लक्षात आले पाहिजे, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.
COMMENTS