मुंबईत महापौरपदासाठी घोडेबाजार होण्याची शक्यतामुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भा

मुंबईत महापौरपदासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना काठावरचे बहुमत मिळाले असले, तरी महापौरपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आता उघड राजकारणापलीकडे जाऊन पडद्यामागील हालचालींवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील काही नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येताच, मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य फूट टाळण्यासाठी आणि नगरसेवकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील सर्व 29 नगरसेवकांना वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. सत्तास्थापनेचा निर्णय होईपर्यंत हे नगरसेवक एकत्रच राहणार असल्याची चर्चा आहे. यामुळे ‘नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवण्याचे राजकारण’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दरम्यान, भाजप मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी एकहाती सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे जादुई आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाची साथ भाजपसाठी अपरिहार्य ठरते. हीच गरज लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडून महापौरपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच स्थायी समिती, विषय समित्या आणि अन्य महत्त्वाच्या पदांमध्ये शिंदे गटाला सन्मानजनक प्रतिनिधित्व देण्याची मागणी होऊ शकते. या सार्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, शिंदे गटातील काही नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. आमच्यात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याशी वैयक्तिक वैर नाही, अशी भूमिका या नगरसेवकांनी मांडल्याचे सांगितले जाते. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच महापौरपदाबाबत सूचक वक्तव्य करत, देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर आपलाच होईल, असे म्हटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस सध्या परदेश दौर्यावर असल्याने, या काळात राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी कुजबुजही सुरू आहे. सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्यावर असताना होणार्या या हालचालींमुळे, भाजप-शिंदे गटातील समन्वयाची कसोटी लागली आहे. बीएमसी ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, तिच्या सत्तेवर नियंत्रण मिळवणे हे प्रत्येक पक्षासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच सत्तास्थापनेच्या या संघर्षात केवळ महापौरपदच नव्हे, तर मुंबईच्या प्रशासनावर कोणाचा प्रभाव राहणार, हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. एकूणच, सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पडद्यामागील हालचाली, नगरसेवकांची हॉटेलबंदी आणि महापौरपदासाठीची सौदेबाजी यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांचे लक्ष आता अंतिम निर्णय आणि पुढील राजकीय डावपेचांकडे लागले आहे.
शिंदेंच्या नगरसेवकांची मातोश्रीवर फोनाफोनी?
शिंदे गटाचे काही नवनिर्वाचित नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीला फोन करून, आमच्या मनात उद्धवजी आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही वैर नाही, असे स्पष्ट केल्याचे समजते. या गुप्त वाटाघाटींची कुणकुण लागताच उपमुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने आपल्या नगरसेवकांची रवानगी हॉटेलमध्ये केली असून, महापौर निवडीपर्यंत त्यांना तिथेच ठेवले जाणार आहे.

COMMENTS