Homeताज्या बातम्यासंपादकीय

शहांचे वादग्रस्त वक्तव्य आणि पडसाद..

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये जे वादग्रस्त वक्तव्य केले त्यावरून देशभरात पडसाद उमटतांना दिसून येत आहे. खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दहशतवादाच्या घटना चिंताजनक
नोटबंदीची वैधता आणि परिणाम
कर्मचारी कपातीचे संकट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये जे वादग्रस्त वक्तव्य केले त्यावरून देशभरात पडसाद उमटतांना दिसून येत आहे. खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलतांना इतिहासाचे भान असणे आवश्यक आहे. मात्र ते भान शहा यांना दिसून येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतीय संविधानापुरतेच मर्यादित नसून, देशातील तमाम जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणारे ते क्रांतीकारक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या अस्मिता या तीव्र आहेत. अशावेळी शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतांना शब्दांचे भान ठेवणे आवश्यक होते. मात्र ते भान त्यांनी ठेवलेले नाही. शिवाय माफी मागणे सोडाच, याउलट आपण त्यांचा अवमान केलाच नाही, असाच त्यांचा अविर्भाव असल्याचे दिसून आले. खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उदोेउदो संघ असो की भाजप यांच्याकडून सातत्याने होतांना दिसून येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही दशकांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी दिसून येतात. खरंतर संघ असो की भाजप यांच्याकडून महात्मा गांधी यांच्यावर टीका करण्यात येतात, त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील धोरणांवर टीका केली जाते, मात्र ते चालून जाते, पचवले जाते, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करणे, त्यांची अवहेलना करणे सोपे नाही, कारण आंबेडकरी समाज जसा प्रगल्भ आहे, तसा तो दक्ष आहे. त्यातच 2024 ची लोकसभा निवडणूक ही संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याभोवतीच केंद्रीत झालेली असतांना शहा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटले नसते तर नवल वाटायला नको. आंबेडकर-आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे, यापेक्षा देवांच्या नावाचा जप केला असता तर स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य शहा यांनी केले. खरंतर आंबेडकर यांनी आपल्या जीवनात देवाला अजिबात स्थान दिले नाही. जो समाज हजारो वर्ष, शोषित-पीडित होता, त्याच्या उत्थानासाठी कोणत्याही देवाने जन्म घेतला नाही, त्यामुळे या संकल्पना थोतांड आहे, असे आंबेडकरांचे स्पष्ट मत होते. असे असतांना आंबेडकर म्हणणे ही फॅशन झाली म्हणण्याचा अर्थ देखील शहा यांनी स्पष्ट करायला हवा होता. खरंतर आंबेडकर यांचे कर्तृत्व शहा यांनी पुन्हा एकदा समजून घेतले पाहिजे. त्यांचा अभ्यासाचा प्रचंड आवाका, जगातील बहुतांश देशांच्या संविधानाचा बारकाईने अभ्यास, त्यांची संसदेतील भाषणे, त्यांनी संविधान सभेत दिलेले योगदान या बाबी जर शहा यांनी बघितल्या असत्या तर कदाचित शहा यांना असे वक्तव्य करण्याची गरज वाटली नसती. मात्र अभ्यास न करता बोलणे झाल्यास आणि संघ आणि भाजपचा चष्मा वापरल्यास असे वक्तव्य निघणार यात शंका नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्या जीवनात आमुलाग्र बदल झाला, त्यांच्यामुळे आपल्याला माणुसकीचे जीणे जगण्यास मिळते, हा विश्‍वास लाखो लोकांच्या मनात आजही प्रज्वलीत आहे. त्यामुळे आंबेडकरांप्रती आंबेडकरी समाजाची अस्मिता अधिक तीव्र आहे, त्या अस्मितेला चिरडण्याचे काम शहा यांच्या वक्तव्याने केले. खरंतर अनवधनाने चुकीचे वक्तव्य निघाले असेल तर शहा यांनी माफी मागून त्यावर पडदा टाकणे आवश्यक होते. मात्र काँगे्रसने कसा आंबेडकरांचा छळ केला, याचे उदाहरण सांगण्यास सुरूवात शहा यांनी केली. वास्तविक पाहता काँगे्रसने कसा छळ केला, काँगे्रसने त्यांचा कसा पराभव केला हा इतिहास झाला, मात्र त्यांच्या अवमानाचे काय? हा प्रश्‍न अनुत्तरित राहतोच. यानिमित्ताने काँगे्रसच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे आंबेडकरांविषयी यापुढे तरी बोलतांना शहा चुकीचे बोलणार नाही, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. शहा यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढे यावे लागले. यातच सर्व काही आले. खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्थित्तंरांचे प्रतीक आहे. त्यांनी या देशातील शोषित-पीडितांना सन्मानाचे जगणे जगण्याचा हक्क संविधानातून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती असे वक्तव्य करणे भारतीय समाजाला अपेक्षित नाही, त्यामुळेच त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे.

COMMENTS