संगमनेर/प्रतिनिधी ः वारंवार टाकलेल्या छापल्यानंतर देखील संगमनेरातील बहुचर्चित कत्तलखाने सुरूच आहेत. कोणत्याही प्रकारच्या कारवाईला न घाबरणार्या क

संगमनेर/प्रतिनिधी ः वारंवार टाकलेल्या छापल्यानंतर देखील संगमनेरातील बहुचर्चित कत्तलखाने सुरूच आहेत. कोणत्याही प्रकारच्या कारवाईला न घाबरणार्या कसायांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आपले धंदे सुरूच ठेवले आहे. गुरुवारी पहाटे पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयातील पथकाने केलेल्या एका कारवाईत तब्बल 1700 किलो गोमांस आणि दोन चार चाकी वाहने असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील मोगलपुरा येथे आयुब तांबोळी यांच्या चाळेच्या दोन नंबरच्या खोलीमध्ये सोन्या कुरेशी व त्याचा साथीदार सलीम कुरेशी हे दोघे गोवंश जनावराची कत्तल करत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. उपाधीक्षक संजय सातव यांनी आपल्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव व प्रमोद गाडेकर यांना सोबत घेत ही कारवाई केली. पथकातील कर्मचार्यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी रात्री सव्वा वाजता छापा टाकला असता तेथे तिघेजण गोमांस एका पिकअप आणि ओमनी कारमध्ये भरताना पथकाला दिसले. त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर ओमनी आणि पीकअप चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले. पकडलेल्या आरोपींमध्ये आसिफ इकबाल कुरेशी (वय 32 वर्ष ह. रा. मदिनानगर संगमनेर मूळ रा. मालेगाव, नासिक) याच्या सहित एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी हे गोमांस सोनू रफिक कुरेशी व सलीम साटम कुरेशी या दोघांचे मालकीचे असल्याबाबत सांगितले. वाहन चालकांविषयी मात्र पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी आपल्या कारवाईमध्ये कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस, एक पिकअप, एक ओमनी कार, कुर्हाड कानस चाकू आधी कत्तलीसाठी लागणारे नऊ लाख साठ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आसिफ इकबाल कुरेशी, सोनू रफिक कुरेशी सलीम साटम कुरेशी यांच्यासह दोन्ही वाहनांवरील अज्ञात वाहन चालक आणि एका विधी संघर्ष बालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील दोघांना पोलिसांनी पकडले असून अन्य आरोपी फरार झाले असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलीस उपाधीक्षकाच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर कत्तलखाना चालकाचे नाव निष्पन्न झाले असून कत्तलखाना चालक फरार झाले. फरार झालेल्या दोघांचालकांसह दोन्ही कत्तलखाना चालकांना पकडण्याचे काम शहर पोलिसांना करावे लागणार आहे. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी अद्यापही फरार असून त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे शहर पोलीस या आरोपी संदर्भात नेमकी काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
COMMENTS