आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचा उपक्रमगेवराई । प्रतिनिधीसमाजातील अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. अशा समस्यांवर मात क

आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचा उपक्रम
गेवराई । प्रतिनिधी
समाजातील अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. अशा समस्यांवर मात करण्यासाठी विज्ञाननिष्ठ समाज घडवणे आवश्यक आहे. विज्ञानामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा यावर विजय मिळवता येतो. असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधीर येवले यांनी केले. ते ’आजीवन शिक्षण आणि विस्तार’ विभागाच्या वतीने ’अंधश्रद्धा, विज्ञान आणि अज्ञान’ या विषयावर समाज प्रबोधनपर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संगीता आहेर होत्या.
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय, गेवराई च्या ’आजीवन शिक्षण व विस्तार विभाग’ चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मौजे मुधापुरी येथे ’अंधश्रद्धा, विज्ञान आणि अज्ञान’ या विषयावर समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा डॉ. सुधीर येवले म्हणाले की, आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात अज्ञान आणि अंधश्रद्धा आहेत. शिक्षित वर्ग ही याला अपवाद नाही. समाजातील अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी विज्ञानातील, तर्क आणि विवेक यांचा अवलंब करून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्या शिवाय समाज प्रगत होऊ शकत नाही. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रा. डॉ. संगीता आहेर यांनी नमूद केले की, अशा प्रकारचे समाज प्रबोधनपर कार्यक्रम ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणतात आणि नागरिकांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाची जोपासना करतात. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. शिवाजी दिवाण यांनी केले. प्रास्ताविक आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी तर आभार प्रदर्शन कु. गुंजन धापसे हीने केले. या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS