आज देशातील १० राज्यांमध्ये ९६ लोकसभा मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्याची मतदान फेरी होत आहे. यामध्ये, दक्षिण भारतातील मतदान जवळपास आटोपले गेले आहे;

आज देशातील १० राज्यांमध्ये ९६ लोकसभा मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्याची मतदान फेरी होत आहे. यामध्ये, दक्षिण भारतातील मतदान जवळपास आटोपले गेले आहे; आज, तेथे तेलंगणातील १७ जागांवर मतदान होऊन, दक्षिण भारतातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल! तिसऱ्या टप्प्यापर्यंत देशातील मतदान हे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेल्याचे जवळपास सर्वच राजकीय तज्ञ आणि विश्लेषक सातत्याने म्हणत आहेत. त्या संदर्भातील आकडेवारी पुन्हा पुन्हा मांडत आहेत. गेल्या महिनाभरापासूनच शेअर बाजाराचा सूचकांक हा दर दिवशी घसरतो आहे. विशेषज्ञांच्या मते हा सूचकांक घसरण्याचे कारण, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना याची चुणूक लागली आहे की, देशात ४ जूनला सरकार बदलते आहे; अर्थात, शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदारांनी खाजगी सर्व्हे केलेले आहेत. ज्यावर प्रसिद्धीसाठी बंदी आहे. मात्र, या सर्वांमधून बाहेर आलेल्या आकडेवारीनुसार गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीला परत काढून घेत आहेत. त्यामुळे शेअर बाजारचा सूचकांक खाली येत असल्याचे निर्देशक देखील, सत्ता बदलाचे आहे; असा निष्कर्ष मानला गेला आहे! आज चौथ्या टप्प्याचे मतदान आहे, यामध्ये दक्षिण भारतातील तेलंगणाच्या १७ जागा सोडल्या तर, महाराष्ट्रामध्ये ११, मध्य प्रदेशात ८, पश्चिम बंगालमध्ये ८, बिहारमध्ये ८, झारखंडमध्ये ४, ओडिसामध्ये ४ आणि जम्मू काश्मीरच्या एका जागेचा समावेश आहे. या फेरीत पुन्हा एक गोष्ट स्पष्ट होईल की, या ९६ पैकी साधारणत: उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार त्याचप्रमाणे झारखंड आणि तेलंगाना शिवाय पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्या जागा वाढवता येणार नाहीत. किंबहुना, मागच्यावेळी जेवढ्या जागा त्यांना मिळाल्या होत्या; त्या जागांमध्ये यावेळी प्रत्येक राज्यात घटच होणार असल्याचा अंदाज, तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यातच अरविंद केजरीवाल हे तरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी जो अंदाज मांडला आहे, तो देखील एनडीए आघाडीला सत्तेपासून बाजूला ठेवणारा आहे. अर्थात, प्रत्येकाची आकडेवारी ही प्रत्यक्ष फिल्डवर नेमकं काय चाललेलं आहे, हे जाणून घेऊनच बाहेर आलेली आहे. यावेळी कोणताही अंदाज हवेत आहे, असं म्हणता येणार नाही. तरीही, या निवडणुकीत कोणत्याही नेत्याची किंवा पक्षाची लाट आहे, असं म्हणता येत नाही.
१९७६ नंतर देशाच्या जनतेने पहिल्यांदाच आपल्या हातात निवडणुकीची सूत्रे घेतली आहेत. सर्व राजकीय पक्ष जनतेच्या अवतीभोवती आपले मुद्दे प्रस्तुत करीत आहेत. त्यातूनच या निवडणुका पुढे जात आहेत. अर्थात, अजून यानंतर तीन टप्प्यातील मतदान होईल. एकूण सात टप्प्यातील मतदानानंतर मतमोजणी होईल. १ जूनला शेवटचे मतदान झाल्यानंतर चार जूनला मतमोजणी होईल. मतमोजणीच्या काळापर्यंत सगळेच पक्ष दावे-प्रतिदावे निश्चितपणे करतील. परंतु, तीन फेऱ्यानंतर ४०० पार चा आकडा भाजपा आणि एनडीए हे विसरले होते. परंतु, आज होणाऱ्या मतदानामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये अधिक जागा असल्याने, शिवाय दक्षिण भारतातील निवडणुका जवळपास संपल्याने एक नरेटिव्ह बनवून ठेवण्यासाठी मोदी आणि शहा यांनी ४०० पार चा नारा देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. तरी तो केवळ एक मानसशास्त्रीय प्रयोग आहे; किंबहुना, उत्तर भारतातील मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी केलेला तो एक डाव आहे; यापलीकडे त्याला फारसे महत्त्व नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्याच्या निवडणुका या अतिशय चुरशीच्या आहेत. प्रत्येक राज्यात उमेदवार दोनहून अधिक असले तरी, खरी चुरशीची लढत मात्र एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्या दरम्यानच आहे. अर्थात, भाजप आणि इंडिया आघाडी एका बाजूला तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी हे दुसऱ्या बाजूला. त्यामुळे सर्वच राज्यांमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीचे इंडिया आघाडीचे स्वरूप शक्तिशाली झाले आहे. प्रत्येक राज्यात एक सत्ताधारी किंबहुना गतकाळात सत्ता उपभोगलेल्या पक्षाचेच बळ इंडिया आघाडीला मिळाले आहे. त्यामुळे यावेळी निवडणूक आपण खेचून आणणार, असा आत्मविश्वास राहुल गांधी हे सातत्याने व्यक्त करीत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे सातत्याने राहुल गांधी आणि हिंदू मुस्लिम या प्रयत्नांच्या पलीकडे दुसरं काहीही सकारात्मक या निवडणुकीत अद्याप पावतो करू शकलेले नाही. मतदार हा नेहमीच सकारात्मक बाबींकडे वळतो, असं २०१४ च्या निवडणुकीला अच्छे दिनच्या घोषणेतून जसं सिद्ध झालं, तसं २०१९ मध्ये अजून पाच वर्षे दिली तर निश्चित बरे होईल, या याचनेवर बहुमत मिळाले होते. तर, आम्ही विकास करून दाखवू या ओळीसाठी भारतीय मतदारांनी पुन्हा एकदा मनाला आवर घालून, आपलं मत भाजप आणि मोदींना दान केलं होतं. परंतु, तिसऱ्यांदा आता भाजपला सांगण्याची सोय राहिली नाही. यावेळी जनता ही आपसुकच ठरवून मोकळी झाली आहे की, आगामी काळात देशावर सत्ता कुणाची असावी ?
COMMENTS