फोन-पे, रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात वीटभट्टीवर मजूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना रानात नेऊन मारह

फोन-पे, रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात वीटभट्टीवर मजूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना रानात नेऊन मारहाण करत लुटण्यात आले व पोलिसात तक्रार केल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत बाबू दत्तात्रय जामदार (रा. धोंडे- वीटभट्टी, ता. श्रीगोंदा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाचवगाव (ता. नेवासा) येथील संजय सुरवसे याने मजूर देण्याचे सांगत वारंवार फोन केले. त्यानुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी दादाभाऊ जाधव हे मालवाहू गाडीतून चिंचोली फाटा, कोल्हार येथे आले असता तेथे संजय सुरवसे, आकाश मोरे व दादासाहेब सूर्यवंशी हे दुचाकीवर आले.“आमच्या मागे या,” असे सांगून त्यांना रानात नेण्यात आले. तेथून एका मजुराच्या घरी नेऊन दोन मजुरांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात आले. मात्र त्यापैकी एकाने आपले नाव सांगितले नाही. त्यानंतर पुन्हा फिर्यादींच्या वाहनामागे दुचाकीवरून जात असताना तांबे गावाच्या शिवारातील हॉटेल येथे त्यांना थांबवून जबरदस्तीने पिकअपमध्ये बसवण्यात आले.
यानंतर कांडगाव (ता. राहुरी) येथील जंगलात नेऊन शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. “तुमच्यासोबत कामाला येणार नाही, सुरवसे आमचाच माणूस आहे,” असे म्हणत धमकावले. तसेच फिर्यादींच्या खिशातील २ हजार ४०० रुपये व मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेण्यात आला.
दरम्यान, फिर्यादींच्या फोन- पे खात्यातून टप्प्याटप्प्याने २७ हजार, २० हजार व ३ हजार असे एकूण ५० हजार रुपये काढून घेण्यात आले. यानंतर पोलिसात तक्रार केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
या प्रकरणी संजय सुरवसे (रा. पाचवगाव), आकाश गोपाळ मोरे (रा. सोनगाव), दादासाहेब सूर्यवंशी (रा. बेलापिंपळगाव), दोन अनोळखी कामगार, किरण (पूर्ण नाव माहिती नाही) व अन्य दोघांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

COMMENTS