Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील रस्ते 1 मेपर्यंत अतिक्रमणमुक्त होणार

लातूर प्रतिनिधी - जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्या अडचणी, तक्रारी सोडविण्याला प्रशासनाचे प्राधान्य आहे. यासाठी जिल्ह्यात विविध महसू

हादगाव- निवघ्यातील अवैध धंद्यांना अभय कोणाचे ?
जत तालुक्यात तरूणाची दगडाने ठेचून हत्या
शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या

लातूर प्रतिनिधी – जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्या अडचणी, तक्रारी सोडविण्याला प्रशासनाचे प्राधान्य आहे. यासाठी जिल्ह्यात विविध महसूल मंडळांमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी गुरुवारी दिली तसेच जिल्ह्यातील रस्ते 1 मेपर्यंत अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. मुरूड येथे आयोजित या वर्षीच्या पहिल्या समाधान शिबिरात ते बोलत होते.
लातूरचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी गोसावी, तहसीलदार स्वप्नील पवार, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, उपविभागीय कृषी अधिकारी महेश क्षीरसागर, मुरूडच्या सरपंच अमृता नाडे, उपसरपंच हणमंत नागटिळक, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वैभव सापसोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. प्रशासकीय विभागांकडे प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्राप्त निवेदने, तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून त्यांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात येतील तसेच या अनुषंगाने करण्यात येणा-या कार्यवाहीचा नियमितपणे आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या वेळी सांगितले. शेतक-यांना वेळेत खरीप पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या जिल्हा स्तरीय बैठकीत निर्देश दिले जातील तसेच विविध शासकीय विभागांकडे लाभार्थ्यांच्या प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे ते या वेळी म्हणाले. जिल्ह्यात नकाशामध्ये असलेले सर्व प्रकारचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या 1 मेपर्यंत सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून हे रस्ते वापरत आणण्याचे उद्दिष्ट आहे. या सोबतच वहिवाटीखाली असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमणही काढण्याची कार्यवाही केली जाणार असून रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शेतकरी, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले तसेच जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबांचे सर्व्हेक्षण सुरू असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. समाधान शिबिराला उपस्थित शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांना या वेळी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी क्षीरसागर यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत पीक प्रात्याक्षिके, खरीप हंगामातील गट प्रात्यक्षिके, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आदी योजनांची माहिती दिली तसेच गट विकास अधिकारी भालके यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या आवास योजना, रोहयो, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत आदी योजनांची माहिती दिली. महावितरणमार्फत सौर कृषी पंप योजनेची माहिती देण्यात आली.

COMMENTS