मृतदेह जंगलात पुरलेल्या जागेवरून काढला बाहेर छ. संभाजीनगर : शहरातील उस्मानपुरा परिसरातून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या शासकीय अभियांत्रिकी म

मृतदेह जंगलात पुरलेल्या जागेवरून काढला बाहेर
छ. संभाजीनगर : शहरातील उस्मानपुरा परिसरातून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवृत्त विभागप्रमुखांचा आर्थिक वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सखोल तपासानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली असून सुमारे चाळीस दिवसांनी जंगलात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.
ज्योतीनगर परिसरातील अभिरिका अपार्टमेंटमध्ये राहणारे राजाभाऊ सुभराव लोंढे (वय 60) काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या भावाने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान लोंढे हे शेवटचे त्यांच्या परिचित व्यक्तीसोबत दौलताबाद परिसरातील एका शेतघरात मेजवानीसाठी गेले होते, अशी माहिती समोर आली. प्राथमिक चौकशीत संशयिताने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मेजवानीनंतर पहाटे शहरातील रुग्णालयाजवळ लोंढे यांना सोडून दिल्याचा दावा त्याने केला होता. मात्र बराच काळ उलटूनही लोंढे यांचा कोणताही मागमूस न लागल्याने कुटुंबीयांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि परिसरातील चित्रण नोंदींचा आधार घेत तपास सुरू केला. संशयितांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळी विशाल राठोड याने गुन्ह्याची कबुली दिली. आर्थिक देवाणघेवाणीतील वादातून हा खून केल्याचे तपासात उघड झाले. मेजवानीदरम्यान लोंढे यांना मद्य दिल्यानंतर शहराकडे परत येताना साजापूर शिवारातील रेल्वे पुलाजवळ त्यांच्या डोक्यात पिस्तूलातून गोळी झाडून हत्या करण्यात आली, असे तपासात समोर आले. त्यानंतर आरोपींनी मृतदेह गेवराई तांड्याजवळील जंगलात नेऊन आधीच खोदलेल्या खड्ड्यात टाकला. पुढे यंत्राच्या साहाय्याने माती टाकून मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर जंगलातील खड्डा उकरून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

COMMENTS