मुंबई : ठाकरे गटातील नेत्यांची कोणत्याही कारणाविना कमी केलेली सुरक्षा पूर्ववत करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिकेद्वारे करण्य
मुंबई : ठाकरे गटातील नेत्यांची कोणत्याही कारणाविना कमी केलेली सुरक्षा पूर्ववत करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी ही याचिका दाखल केली आहे. यात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह ठाणे पोलीस आयुक्तांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. यावर 9 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राजन विचारे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यात याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा चुकीच्या आणि राजकीय हेतूने कमी केली आहे. कोणत्याही काराणविना अचानकपणे ही सुरक्षा कमी करण्यात आल्यामुळे आपल्यासह कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटाच्या काही कार्यकर्त्यांना विनाकारण सुरक्षा पुरवल्याचा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून विरोधकांना प्रचंड त्रास दिला जात आहे. या अराजकतेची व्याप्ती इतकी आहे की, खासदाराला घाबरवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात असून शिंदे किंवा भाजपशी हातमिळवणी न केलेल्या खासदार आणि आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, असा आरोपही विचारे यांनी केला आहे. सध्या आपल्या सुरक्षिततेसाठी एकच पोलीस हवालदार तैनात आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षा पुन्हा पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
COMMENTS