Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रत्येक गोष्टीत धर्म आणणे भाजपची जुनी पद्धत

काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोपवर्धा ः टिपू सुलतान प्रकरणावरून भाजपकडून होत असलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन

छत्रपतींच्या त्यागातून मिळालेले स्वराज्य अखंड हिंदुस्थानचे बलस्थान : पालकमंत्री विखे
शिवरायांचा कारभार हा लोककल्याणकारी होता : माजी आ. काळे
कुळवाडी भूषण रयतेचे राजे 

काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
वर्धा ः टिपू सुलतान प्रकरणावरून भाजपकडून होत असलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला भाजपने शिकवण्याची गरज नाही, असे स्पष्ट करत त्यांनी प्रत्येक विषयात जात आणि धर्म आणणे ही भाजपची जुनी राजकीय पद्धत असल्याचा आरोप केला.
अलीकडे सपकाळ यांनी कथितरीत्या टिपू सुलतान यांचा संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी तुलना केली होती. या विधानावरून भाजपने त्यांच्यावर टीका करत माफीची मागणी केली आहे. रविवारी वर्धा येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची आन, बान आणि शान आहेत. त्यांचा पराक्रम अद्वितीय असून त्यांच्या स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा पुढे आपल्या राज्यघटनेपर्यंत पोहोचते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाची मदत घेतल्याचा दावा करत सपकाळ म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेवर भाष्य करण्यापूर्वी भाजपने स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. महापुरुषांच्या छायाचित्रांवरून निर्माण होणारा वाद हा व्यापक पातळीवर राज्यघटना कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. याआधी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना कठोर शब्दांचा वापर केला होता. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती; मात्र आता त्यांनी आवेशाने उत्तर दिले, याचा अर्थ राज्यातील मूलभूत प्रश्‍नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सपकाळ यांनी सूचित केले. या संपूर्ण वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, महापुरुषांच्या नावावरून सुरू झालेली शब्दयुद्धाची मालिका आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

माझ्या विधानाचा विपर्यास
पत्रकारांनी कार्यालयात महापुरुषांचे छायाचित्र लावण्याबाबत प्रश्‍न विचारला होता. त्यावर त्यांनी मत व्यक्त करताना शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार दिला आणि त्याचा आदर्श टिपू सुलतानने घेत इंग्रजांविरुद्ध लढा दिला, असे म्हटले होते. मात्र मूळ विधानाचा विपर्यास करून त्याला हिंदू-मुस्लिम वादाचा रंग देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

भाजपच्या जाहिरनाम्यात टिपू सुलतानचा फोटो
काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर दुहेरी भूमिकेचा आरोप करताना सांगितले की, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या जाहिरनाम्यात टिपू सुलतान यांचा फोटो वापरण्यात आला होता. निवडणुकीत टिपू सुलतान चालतो, पण राजकीय टीका करण्यासाठी त्याच नावाचा वापर केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा उल्लेख करत भाजपने त्यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. काही नेत्यांच्या विधानांवर भाजप मौन बाळगतो, पण आमच्याकडून माफीची मागणी करतो, अशी टीकाही त्यांनी केली.

COMMENTS