भारनियमनात दिलासा…अतिरिक्त वीज उपलब्ध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारनियमनात दिलासा…अतिरिक्त वीज उपलब्ध

मुंबई/प्रतिनिधी : तापमानाच्या वाढत्या पार्‍यात कोळसा टंचाई व वाढलेल्या मागणीमुळे सुरु झालेले विजेचे भारनियमन कमीत कमी करुन वीजग्राहकांना दिलासा देण्य

कोपरगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरांना ठोकल्या बेडया
…तर, शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही – केसरकर    
कन्हैय्या कुमार यांनी अमित शाह यांच्यावर साधला निशाणा | ‘सकाळच्या ताज्या बातम्या’ | LokNews24

मुंबई/प्रतिनिधी : तापमानाच्या वाढत्या पार्‍यात कोळसा टंचाई व वाढलेल्या मागणीमुळे सुरु झालेले विजेचे भारनियमन कमीत कमी करुन वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. शुक्रवारी (दि. 22) महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे. महानिर्मितीसह इतरही कंपन्याकडून अतिरिक्त वीज उपलब्ध होणार असल्याने भारनियमन कमी होऊन वाढत्या तापमानात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
महावितरणला महानिर्मितीकडून साधारणत: 6 हजार 500 मेगावाटपर्यंत वीज मिळत होती, ती 7 हजार 500 मेगावाटपर्यंत मिळणार आहे तर अदानी पॉवर कंपनीकडून 1 हजार 700 मेगावाटवरून 2 हजार 250 मेगावाट वीज पुरवठा उपलब्ध होत असून शुक्रवारी मध्यरात्रीपासून 3 हजार 11 मेगावाटपर्यंत विजेची उपलब्धता होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, विजेच्या उपलब्धततेनुसार मागणी व पुरवठा यातील तूट कमी झाल्यास राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असून उन्हाच्या वाढत्या तापमानातील वीज संकटात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असा दावा महावितरणने केला आहे.
महावितरणकडून राज्यातील 2 कोटी 80 लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची 24 हजार 500 ते 25 हजार मेगावाट अशी अभूतपूर्व मागणी राहिली आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून प्रामुख्याने कोळसा टंचाई तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे 2 हजार 300 ते 2 हजार 500 मेगावाट विजेची तूट निर्माण झाली होती. परिणामी नाईलाजास्तव राज्यात काही ठिकाणी भारनियमन करावे लागले. त्यातही देशात सर्वत्र कोळसा व वीज टंचाईचे स्वरुप तीव्र असल्याने विजेच्या उपलब्धतेबाबत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती, असे स्पष्ट करून महावितरणने म्हटले की, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विजेची तूट भरून काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे व कोणत्याही परिस्थितीत राज्यात किमान भारनियमन व्हावे यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. विजेच्या तुटीची संभाव्य स्थिती पाहता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आपत्कालिन नियोजन केले व कमीतकमी भारनियमन व्हावे यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याचे अथक प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांमुळे महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीज निर्मिती कंपन्यांनी अतिरिक्त वीज उपलब्धततेची ग्वाही महावितरणला दिली आहे. महावितरणने केलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यात व कोळसा टंचाईमुळे वीज संकट ओढवले असताना राज्यातील नागरिकांना भारनियमनातून मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्‍वास महावितरणने व्यक्त केला आहे.

सुरक्षा ठेवीचे सहा हप्ते
वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास सहा हप्त्यांची सोय करण्यात आली असून, महावितरणकडून वीजग्राहकांना याबाबत दिलासा दिला आहे. तसेच अधिकची सुरक्षा ठेव समायोजित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे. तसेच ग्राहकांचा सरासरी वीजवापर कमी झाला असल्यास सुरक्षा ठेवीमधील जादा रक्कम देखील त्यांच्या वीजबिलामध्ये समायोजित करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2021 च्या विनिमय 13.1 नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्‍चित करण्यात येते. याआधी जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे.
या नवीन तरतुदीनुसार एप्रिल महिन्यामध्ये वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. मात्र, या बिलाची रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासंबंधीची माहिती सुरक्षा ठेवीच्या स्वतंत्र बिलावर नमूद करण्यात आली आहे. तसेच ज्या ग्राहकांचा वीज वापर कमी असेल किंवा झाला असेल, मात्र त्या तुलनेत नियमानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम अधिक असेल, तर सुरक्षा ठेवीची जादा रक्कम पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये समायोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विनिमय 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्यामुळे सुरक्षा ठेवीची बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

COMMENTS