मुंबई : देशातील एकूण परकीय गुंतवणुकीची एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल 52.4

मुंबई : देशातील एकूण परकीय गुंतवणुकीची एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल 52.46 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यातील एकूण परकीय गुंतवणुकीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण 3 लाख 62 हजार 161 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. आता सव्वा दोन वर्षांत 3 लाख 14 हजार 318 कोटी रुपयांची गुंतवणूक शासनाने राज्यात आणली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी असल्याने एकूण गुंतवणुकीचा आकडा आणखी वाढणार आहे.

उद्योगस्नेही धोरणामुळे राज्य गेले दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर राहिले आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1 लाख 34 हजार 959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70 हजार 795 कोटी अर्थात 52.46 टक्के गुंतवणूक राज्यात आली आहे. कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, हरयाणा, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीच्या एकत्रित बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात 2022-23 मध्ये 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती जी कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती, 2023-24 मध्ये 1 लाख 25 हजार 101 कोटी रुपये गुंतवणूक राज्यात आली होती जी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात व कर्नाटक यांच्या एकत्रित बेरजेहून अधिक होती.
एप्रिल ते जून 2024 या तिमाहीत राज्यांमध्ये झालेली गुंतवणूक
पहिला क्रमांक महाराष्ट्र (70,795 कोटी), दुसरा कर्नाटक (19,059 कोटी), तिसरा दिल्ली (10,788 कोटी), चौथा तेलंगणा (9023 कोटी), पाचवा गुजरात (8508 कोटी), सहावा तामिळनाडू (8325 कोटी), सातवा हरियाणा (5818 कोटी), आठवा उत्तरप्रदेश (370 कोटी), नववा राजस्थान (311 कोटी) याप्रमाणे आहे.
COMMENTS