मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात पावसाने बर्याच दिवसांपासून दांडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मुंबई आणि कोकणात पाऊस सोडला तर, इतरत्र अजूनही पु
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात पावसाने बर्याच दिवसांपासून दांडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मुंबई आणि कोकणात पाऊस सोडला तर, इतरत्र अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आलेली पिके कशी जगवायची हा शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी पेरणी पूर्ण केली, तर अनेक जिल्ह्यात अजूनही पेरण्या रखडलेल्या आहेत. मात्र ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी जवळ आला असतांना अजूनही पाऊस आलेला नाही.
राज्यात तब्बल 20 दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील 170 मंडळातील पिके माना टाकत आहेत.मराठवाड्यातील एकूण 468 मंडळापैकी 170 मंडळांत अपेक्षित पावसाच्या 25 ते 75 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील 21 मंडळात अपेक्षेच्या 25 ते 50 टक्केच पाऊस झाला आहे. दुसरीकडे समाधारक पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यातील अनेक धरणांमध्ये काही महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मराठवाड्यातील 76 गावांवर जलसंकट ओढवण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर पाऊस झाला नाही, तर पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार असे चित्र आहे. नुकताच छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयाने राज्य शासनाला याबाबतचा अहवाल पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. त्या अहवालात मराठवाड्यातील 6 तालुक्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत तर 9 तालुक्यांना ऑक्टोबरपर्यंत पाणी पुरेल एवढा पाणीसाठा जवळच्या प्रकल्पांमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यातील 5 तालुक्यांना नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत 36 तालुक्यांना डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पिण्याचे पाणी देणे शक्य होईल. उर्वरित 15 पैकी 10 तालुक्यांना जानेवारी 2024, मार्च 2024 पर्यंत तर 5 तालुक्यांना वर्षभर पाणीपुरवठा होईल, एवढा साठा प्रकल्पात आहे. यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून 68 दिवसांमध्ये फक्त 49 टक्के पाऊस झाला. गेल्यावर्षी मराठवाड्यात 80 टक्के पाऊस झाला होता. मात्र, यंदा नांदेडमधील काही तालुके वगळता समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मोठ्या 11 जलप्रकल्पांसह मध्यम व लघु 866 प्रकल्प, बंधार्यांवर अवलंबून शहर, गावांना पाणीटंचाईची भीती आहे.
मराठवाड्यातील ही तालुके अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत – मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, गंगापूर, सोयगाव तर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर नांदेड जिल्ह्यातील किनवट, बिलोली अर्धापूर, माहूर या तालुक्यात ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल इतके शिल्लक आहे. या महिन्यात जर पुरेसा पाऊस पडला नाही तर, या तालुक्यातील शेतकर्यांवर पाणीसंकट उभे राहण्याची मोठी शक्यता आहे. वैजापूर, फुलंब्री पूर्णा, धर्माबाद, मुदखेड, लोहारा तालुक्यात सप्टेंबरपर्यंत पाणी पुरेल इतके आहे. ऑक्टोबरपर्यंत तग धरू शकतील अशा तालुक्यात घनसावंगी, जाफ्राबाद, हदगाव, भोकर, अंबाजोगाई, परळी, गेवराई, पाटोदा, शिरूर कासारचा समावेश आहे. जायकवाडीच्या पायथ्याला असलेल्या पैठणसह खुलताबाद कुंडलवाडी, शिरुर अनंतपाळ, देवणी, रेणापूर तालुक्यात नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतके सध्या पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे ऑगस्टअखेर पाऊस न झाल्यास मराठवाड्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची चिन्हे आहेत.
COMMENTS