पाथर्डी ः तालुक्यात शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर तालुक्याच्या सर्वदूर भागात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून या पावस

पाथर्डी ः तालुक्यात शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर तालुक्याच्या सर्वदूर भागात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून या पावसामुळे आता तालुक्यातील अनेक गावातील टँकर बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून खते व बी बियाणे विक्रीच्या दुकानात बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची झुंबड उडाली आहे.
गेल्या दोन वर्षांत तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात सर्वाधिक टँकर तालुक्यात चालू होते.जून च्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली नसती तर आणखी भीषण पाणीटंचाई चे संकट तालुक्या समोर उभे राहिले असते. देशात मान्सून दाखल झाला तरीही तालुक्यात मान्सूनचे आगमन मान्सून परतीला लागल्या नंतर होत असते हा आजवरचा इतिहास असला तरीही चालू वर्षी मात्र तालुक्यात मान्सून चे योग्य वेळी आगमन झाल्याने शेतकर्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. शनिवारी रात्री अकरा च्या सुमारास पावसाला सुरवात झाली.शहरासह तालुक्यातील काही भागात दोन तास समाधानकारक पाऊस पडला तर रविवारी दुपारी एक च्या सुमारास पावसाला सुरवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत संततधार पाऊस चालू होता. पावसाचा जोर शहरासह तालुक्याच्या पूर्व भागात अधिक होता. या भागातील टाकळीमानूर, येळी, खरवंडी कासार अकोले या परिसरात तर तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, देवराई, सातवड, भोसे परिसरात चांगला पाऊस झाल्याने काही ठिकाणी तलावात पाणी येऊन नदी नाले, ओढे वाहू लागले आहेत. या पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा आता उपलब्ध होणार आहे. या शिवाय गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी खरवंडी परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे त्या भागातील शेतकर्यांनी कपाशीच्या लागवडीस सुरवात केली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील काही पट्टयात सुद्धा कपाशीच्या लागवडी केल्या आहेत. तालुक्यातील पागोरी पिंपळगाव, सुसरे, सोमठाणे, करंजी परिसरात सुद्धा जोराचा पाऊस झाल्याने त्या भागातील तलावात पाणी साचल्याचे दिसून येत आहे. शहरात सुद्धा चांगला पाऊस झाल्याने अनेकांचे गेल्या काही महिन्यांपासून आटलेल्या बोअरला सुद्धा आता काही प्रमाणात पाणी आल्याने शहरातील पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.
COMMENTS