Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नायगाव तालुक्यातील ‘कीर्ती गोल्ड’ कंपनीवर धाड

अन्न व औषध प्रशासनाची खाद्यतेल भेसळ प्रकरणाची व चौकशी सुरू नांदेड ः नायगाव तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कृष्णूर एमआयडीसी परिसरात कार्यर

नांदेडमध्ये नवजात अर्भकांचे टाकाऊ आयुष्य?
महापालिकेत राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
24 वर्षांनंतरही मैत्रीची नाळ तुटली नाही

अन्न व औषध प्रशासनाची खाद्यतेल भेसळ प्रकरणाची व चौकशी सुरू
नांदेड ः नायगाव तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कृष्णूर एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या कीर्ती गोल्ड या खाद्यतेल निर्मिती करणार्‍या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने अचानक धाड टाकल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, कंपनीच्या दोन स्वतंत्र प्लांटमधून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून भेसळयुक्त खाद्यतेलाचा पुरवठा होत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकत कंपनीतील उत्पादन प्रक्रिया, साठा, कच्चा माल तसेच तयार मालाची तपासणी केली. संशयास्पद वाटणार्‍या खाद्यतेलाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजते. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. परिसरातील काही समाजसेवक व जागरूक नागरिकांनी यापूर्वीही संबंधित कंपनीकडून तेलात भेसळ होत असल्याचा आरोप करत अन्न व औषध प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रारी दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्या तक्रारींवर ठोस आणि निर्णायक कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन झोपेत होते का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही स्थानिक व्यापार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, बाजारात कमी दरात उपलब्ध होणार्‍या या ब्रँडच्या तेलाबाबत पूर्वीपासून संशय व्यक्त केला जात होता. तेलाचा रंग, वास आणि दर्जा याबाबत ग्राहकांकडूनही तक्रारी येत असल्याची चर्चा आहे. खाद्यतेल हा दैनंदिन वापरातील अत्यावश्यक घटक असल्याने त्यात भेसळ झाल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. हृदयरोग, पचनाचे विकार, यकृताचे आजार यांसारख्या गंभीर समस्यांना भेसळयुक्त तेल कारणीभूत ठरू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ आर्थिक गैरव्यवहार म्हणून नव्हे तर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर बाब म्हणून पाहिले जात आहे. नांदेड जिल्ह्यासह नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर या कंपनीचे तेल विक्रीस येत असल्याचे बोलले जात आहे. जर भेसळीचा आरोप सिद्ध झाला, तर हा प्रकार हजारो कुटुंबांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखा ठरणार आहे.

COMMENTS