Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी बसस्थानक झाले 51 वर्षांचे; आता प्रतीक्षा नवीन बस स्थानकाची

राहुरी ः राहुरीच्या बसस्थानकाच्या इमारतीला शनिवारी 25 मे रोजी 51 वर्षे पूर्ण झाले आहेत, आता नवीन बस स्थानक इमारत पुनर्बांधणीसाठी मुहूर्त लाभला आह

पासष्टीनिमित्त काव्यातून दोन मित्रांचा गुणगौरव
आमदार काळेंनी उपोषणाला भेट देत दिला पाठिंबा
कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या

राहुरी ः राहुरीच्या बसस्थानकाच्या इमारतीला शनिवारी 25 मे रोजी 51 वर्षे पूर्ण झाले आहेत, आता नवीन बस स्थानक इमारत पुनर्बांधणीसाठी मुहूर्त लाभला आहे. बरोबर 51 वर्षांपूर्वी 25 मे 1973 रोजी दिमाखामध्ये राज्य परिवहन महामंडळाचे तत्कालीन सदस्य व ज्येष्ठ नेते के. डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. यावेळी आबासाहेब निंबाळकर हे अध्यक्षस्थानी होते. या बसस्थानकाचे कॉन्ट्रॅक्टर मेसर्स सी.एम. मुनोत अँड ब्रदर्स होते. कॉम्रेड पी. बी. पाटील त्यावेळी तत्कालीन राहुरीचे आमदार होते. सध्याच्या मोडकळीस आलेल्या बसस्थानकामध्ये 25 मे 1973 ची कोनशिला अजूनही या बसस्थानकाची ओळख करून देते.
नगर जिल्ह्यातील सर्व सुविधायुक्त असे बसस्थानक म्हणून राहुरी बसस्थानकाची ओळख होती. या बसस्थानकावर भव्य कॅन्टीन, पिण्याचे पाणी, जनरल स्टोअर्स, तिकीट आरक्षणाची व पासेस आणि विशेषतः एस.टी कर्मचार्‍यांसाठी निवासस्थानाची सोय होती. अशी या बस स्थानकाची ख्याती राज्यभर पसरली होती. शिर्डी-शनिशिंगणापूर व महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पर्यटक आणि नागरिकांसाठी राहुरी बसस्थानक एक केंद्रबिंदूच होता. आता 51 वर्षानंतर बहुचर्चित अशा राहुरी बसस्थानकाची लवकरच अद्ययावत पुनर्बांधणी होणार आहे. बसस्थानकाच्या उत्तरेला नियंत्रण कक्षासह प्रवाशांसाठी शेडचे काम सुरू आहे. लवकरच बसस्थानकाच्या भव्य आणि दिव्य इमारतीचे काम सुरू होणार आहे. ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजीमंत्री विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून या बसस्थानकाचे काम लवकरच होणार आहे. वर्षभरापूर्वी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी बसस्थानकाची पुनर्बांधणी या अत्यंत महत्वाच्या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, उपमहाव्यवस्थपक (स्थापत्य) यांची भेट घेऊन पाठपुरावा करत सविस्तर चर्चा केली होती. नवीन बसस्थानकाचा आराखडा तयार असून बसस्थानकातील नियोजित दहा प्लॅटफॉर्मशिवाय अधिकचे दोन ते तीन प्लॅटफॉर्म वाढविण्यात येणार आहेत. राहुरी तालुक्याच्या विस्तार मोठा आहे. त्यामुळे दररोज येथून राज्यभर प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे. त्यादृष्टीने भव्य आणि सुसज्ज असे बसस्थानक असेल. राहुरी तालुक्यातील पोलीस स्टेशनसह पोलीस वसाहत, राहुरी महसूल प्रशासकीय इमारत, पंचायत समिती कॉलनी, ग्रामीण रुग्णालय इमारत, जलतरण तलाव, या महत्त्वाच्या विषयांबरोबरच राहुरी बसस्थानकाचा प्रश्‍न मोठ्या काळापासून प्रलंबित आहे. या विषयांचा राजकीय काथ्याकूट 4 जून नंतर सुरू होणार आहे.

COMMENTS