Homeताज्या बातम्यासंपादकीय

विरोधकांचे प्रश्न; सत्ताधाऱ्यांचे प्रतिप्रश्न !

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ९७ दिवसांनंतर संसदेत १६ तासांच्या चर्चेला प्रारंभ करताना, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी ऑपरेशन सिंदूर कसे यशस्वी झा

बीएड सीईटीत गोंधळ; आधी म्हणाले परीक्षा कालच झाली, नंतर केले दुसर्‍या गावच्या केंद्रात नियोजन
दंडकारण्य अभियानाअंतर्गत पाच हजार झाडांचे वृक्षारोपण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा वेव्हज् विशेषांक प्रकाशित

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ९७ दिवसांनंतर संसदेत १६ तासांच्या चर्चेला प्रारंभ करताना, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी ऑपरेशन सिंदूर कसे यशस्वी झाले याची मांडणी केली. मात्र, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गौरव गोगोई यांनी आपल्या प्रश्नांची सरबत्ती कायम ठेवली. त्यातच तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी देखील सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेचे खंडन करित प्रश्न विचारले. काॅंग्रेसचा प्रश्न होता की, दहशतवादी आले कुठून? या प्रश्नाला सत्ताधारी पक्ष थेट उत्तर देऊ शकले नाहीत. त्यासाठी, त्यांनी प्रतिप्रश्न विचारून वेळ मारून नेली.‌ प्रतिप्रश्नात केंद्रीय मंत्री ललनसिंह यांनी काॅंग्रेसच्या २००४ ते २०१४ याकाळात ६७४ लोक मारले गेले, त्यावेळी, दहशतवादी कुठून आले होते, याचे उत्तर काॅंग्रेसने द्यावे, असा प्रतिप्रश्न केला होता. मात्र, प्रतिप्रश्नाचे एकमेव वैशिष्ट्ये म्हणजे त्यात युक्तिवाद होता. दरम्यान, याच चर्चेत विरोधी पक्षातील खासदारांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, या युद्धानंतर जगातील एकही राष्ट्र आपल्या बाजूने का उभं राहिलं नाही? हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे. जो इराण आपल्याला उधारीवर आणि रुपयांच्या बदल्यात तेल देतो त्या देशाशीही संबंध बिघडले. सार्क देशातील एकही शेजारी देश आपल्यासोबत नाही. कॅनडानेही आपल्याला विरोध केला. त्याचवेळी पाकिस्तानसोबत चीन, अमेरिका, तुर्कस्थान आणि इतर देश उभे राहिले. हे कशामुळे घडले, याचे उत्तर सत्ताधारी पक्षाने द्यायला हवे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तरी कसा? हा हल्ला झाला तेव्हा “गृह मंत्रालय काय करत होतं? सीआय‌एस‌एफ काय करत होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी  संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, या कारवाईत शंभर पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतीय सैन्याने हे ऑपरेशन केवळ २२ मिनिटांत पूर्ण केले. ही कारवाई ६ ते ७ मे २०२४ दरम्यान पार पडली. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले, असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. दरम्यान, श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती लष्कराने दुपारी वाजता दिली होती. यात, तीन दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवनच्या मुलनार भागात कारवाई सुरू केली होती. लष्कराच्या कारवाईदरम्यान संसदेत ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, आमचे सरकार, आमचे सैन्य आणि आमच्या लोकशाही संस्था, सर्व मिळून देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलण्यास वचनबद्ध आहेत. एकंदरीत, एका दीर्घ काळानंतर संसदेत एका गंभीर विषयाच्या चर्चेला प्रारंभ झाला.‌ सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात मतभेद तर, असतीलच! परंतु, लोकशाही व्यवस्थेत संसदीय पातळीवर निकोप चर्चा होणं अपेक्षित असतं. त्याच प्रतिबिंब संसदेतील चर्चेत उमटले. काल, संसद सुरू होताच प्रश्नोत्तराच्या पहिल्या तासाला बिहार निवडणूकीतील एस‌आय‌आर वर प्रश्न विचारण्यावरून गोंधळ उडाला. त्यातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभा १२ वाजेपर्यंत स्थगित केली होती. मात्र, त्यानंतर सत्र सुरू झाल्यावर चर्चा सुरळीत सुरू झाली.

COMMENTS