अकोलेत ठेकेदारांना बिलांची 'खिरापत’ ; नागरिकांचा आरोप अकोले : अकोले तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये

अकोलेत ठेकेदारांना बिलांची ‘खिरापत’ ; नागरिकांचा आरोप
अकोले : अकोले तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये गंभीर स्वरूपाचा गुणवत्तेचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्ष काम न करता किंवा अत्यल्प काम करूनही ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याने अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गर्दनी – बारामती रोड ते मुख्य रस्ता, पिंपळगाव निपाणी ते तालुका हद्द, लिंगदेव ते धुपे, हिवरगाव गणोरे ते खतोडे वस्ती, वाघजाळी ते इजिमा–२७, मोरेवाडी ते खैरदरा, सांगडेवाडी–कुरकुंडी, कोठे बु. ते वनकुटे, इजिमा–१८ ते बहिरवाडी (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) आदी रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र या कामांचा मूळ उद्देश बाजूला ठेवून काम न करता बिले कशी देता येतील, याच हेतूने कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून कारभार रेटला गेल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मार्च २०२५ मध्ये प्रत्यक्ष काम न होता खोदकाम, भरावा, खडीकरण, सिमेंट काँक्रीट आदी कामांची खोटी नोंद अंदाजपत्रकात दाखवून सुमारे पाच कोटी रुपयांचे ऍडव्हान्स पेमेंट ठेकेदारांना अदा करण्यात आले. प्रत्यक्षात केवळ नाममात्र खोदकाम व भराव झाला असून बिलांनुसार झालेले काम जमिनीवर दिसून येत नाही. परिणामी रस्त्यांवर तीव्र चढ-उतार असून वळण सुधारणा व रुंदीकरणाची कामे झालेली नाहीत.
जीएसबी कामात कमी जाडीचे काम दाखवून पूर्ण बिल अदा करण्यात आले. त्यानंतर ड्रायलीन काँक्रीटमध्ये निकृष्ट दर्जाची खडी, जास्त प्रमाणात फ्लाय ऍश व कमी प्रमाणातील सिमेंट वापरल्याने काँक्रीट दर्जाहीन झाल्याचे दिसून येते. सध्या अनेक ठिकाणी ड्रायलीन काँक्रीट उखडले असून अंतिम लेयर पीक्यूसी मध्येही कमी प्रतीचे साहित्य वापरण्यात आल्याने अवघ्या तीन महिन्यांत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात तडे पडले आहेत.
अशा निकृष्ट कामांमुळे हे रस्ते दोन वर्षांतच पूर्णपणे उघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे खराब झालेला अंतिम लेयर पूर्णपणे काढून नव्याने काँक्रीट करावे, ज्या ठिकाणी जीएसबी व ड्रायलीन काँक्रीट निकृष्ट आहे त्या कामांचे पेमेंट ठेकेदारांना देऊ नये, तसेच नव्याने होणाऱ्या कामांची गुणवत्ता नियंत्रण नाशिक विभागामार्फत तपासणी करूनच पीक्यूसीचे काम करावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

“मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत अकोल्यात सुरू असलेली कामे दहा वर्षे तर सोडाच, दोन वर्षेही टिकणार नाहीत. घाईघाईने नव्हे तर उत्तम प्रतीची कामे व्हावीत यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा ग्रामस्थ स्वतः पोकलेन व जेसीबी लावून ही बोगस, निकृष्ट कामे उखडून टाकतील,”
– बाजीराव दराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य

COMMENTS