Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीचे अन्यायी सरकार खाली खेचा

खा. शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सोलापूर ः केंद्रातील मोदी सरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र शेतकर्‍यांचे उत्पन्न सोडाच उलट शेतकर्‍यांच्या आत

राज्यातील चित्र बदलण्यासाठी सत्ताबदल गरजेचा
चार राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा
आरक्षण प्रश्‍नावर सर्वपक्षीय बैठक बोलवा

सोलापूर ः केंद्रातील मोदी सरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र शेतकर्‍यांचे उत्पन्न सोडाच उलट शेतकर्‍यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्याची घणाघाती टीका खासदार शरद पवार यांनी केली. महायुतीचे सरकार अन्यायी आणि जुलम करणारे असून, या सरकारला खाली खेचा असे आवाहन देखील पवारांनी केले. सोलापूरच्या बार्शीमध्ये ’शरद शेतकरी संवाद मेळावा’ पार पडला. यामध्ये ते बोलत होते.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, शेतकर्‍यांच्या डोक्यावरचे ओझे कमी केले पाहिजे. आम्ही 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केली. आमचे सरकार असताना शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून आम्ही शेतमालाला दर दिले. अधिक उत्पन्न झाल्यानंतर शेतकर्‍यांचा शेतमाल जगाच्या बाजारपेठेत जाण्यासाठी विचार केला. फळबागसारखी योजना आमच्या सरकारने आणली होती. याचा शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला, असे शरद पवार म्हणाले. पुढे त्यांनी मोदींवर टीका केली आहे. आज मोदींचे राज्य आहे. अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. या सत्तेचा वापर शेतकर्‍यांसाठी केला जात नाही. लोकसभेला 400 पार म्हणणार्‍यांना 300 ही पार करता आल्या नाहीत. मोठा भाऊ आणि लहान भाऊ असे आमच्यात कोणी नाही, या सरकारला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आंध्र आणि बिहारच्या जीवावर केंद्र सरकार सत्तेवर आले आहे. सरकारची धोरणे बदलयची असेल तर सरकार बदलायला पाहिजे. अन्याय आणि जुलम करणारे सरकार खाली खेचले पाहिजे, असा हल्ला शरद पवारांनी केला आहे.
यावेळी पवारांनी मराठा आरक्षणावर भाष्य करतांना देवेंद्र फडणवीसांवरही टीकेची तोफ डागली. पवार म्हणाले की, आम्ही जात, पात न बघता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने गुलाल उधळला. कोणत्या आधारावर गुलाल उधळला त्यांना विचारा. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे असे सांगितले होते. आमची नक्कल ते निवडणुकीच्या तोंडावर करत असल्याचा आरोप पवार यांनी केला. तसेच  मराठवाड्यातील जनता आमच्या सोबत आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये देखील जनता आमच्या सोबत आहे. बार्शी आणि पंढरपूर या दोन गावात सायंकाळी सभा होतात आणि त्या चांगल्या होतात. आज भर उन्हात तुम्ही इथे उपस्थित आहात, म्हणजेच आपण बदलाच्या दिशेने वाहत असल्याचे हे संकेत आहेत. नरेंद्र मोदी यांचा चेहरा राज्यात चालणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली – राज्यभर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून, राज ठाकरेंना घेराव घातल्यानंतर रविवारी सोलापूरमध्ये मराठा बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची गाडी बार्शीजवळ अडवली. मराठा आरक्षणाबाबत आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली. आंदोलकांनी गाडी अडवताच शरद पवार यांनी दरवाजा उघडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवारांनी यावेळी माझा पाठिंबा आहे, असे म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.

COMMENTS