Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील 29 महापालिका क्षेत्रात मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा हक्क सर्व मतदार

अहिल्यानगरमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड; दोन संशयित ताब्यात
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
गुजर समाज निवडणुकीसाठी एकवटला

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा हक्क सर्व मतदारांना सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रांमध्ये त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अधिसूचनेनुसार, राज्य शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येणारी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच विविध सार्वजनिक संस्था यांना ही सुट्टी लागू राहणार आहे. विशेष बाब म्हणजे, मतदान क्षेत्राबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही या सार्वजनिक सुट्टीचा लाभ घेता येणार असून, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा, हा शासनाचा उद्देश आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय आस्थापने, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम कार्यालयांनाही ही सुट्टी लागू राहणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व ठिकाणी ही सुट्टी प्रभावी असेल. सार्वजनिक सुट्टी ज्या महानगरपालिकांमध्ये लागू करण्यात आली आहे, त्यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्‍चित करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, मतदानाच्या दिवशी कोणालाही कामाच्या कारणाने मतदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाने हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होत आहे. मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS