डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील दगडफेक पूर्वनियोजित ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील दगडफेक पूर्वनियोजित ?

पोलिसांना संशय, आणखी 19जणांचा शोध सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सायंकाळी नगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील दगडफेक व अन्य अनुचित प्रकार पूर्

एकता फौंडेशनच्यावतीने शुक्रवारी ‘जॉब फेअर’चे आयोजन
राहुरीतील व्यापार्‍याला 23 लाख रूपयांना घातला गंडा
दोन वर्ष गतीमान राहून ध्येयापर्यंत पोहचा ः कुलगुरू डॉ.काळकर

अहमदनगर/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सायंकाळी नगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील दगडफेक व अन्य अनुचित प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, मिरवणुकीच्यावेळी तेलीखुंट येथील दगडफेकीच्या घटनेत आणखी 19 नवे आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
मिरवणुकीदरम्यान घडलेली शहरातील दगडफेकीची घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय असून, पोलिसांचा त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते. ध्वनिचित्रफितीच्या आधारे दगडफेक व अन्य अनुचित प्रकाराप्रकरणी नवीन 19 आरोपी निष्पन्न झाल्याचे व त्यांचा अहवाल न्यायालयाला पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी सुरूवातीला 13 आणि आता 19 आरोपींचा सहभाग सिध्द झाल्याने आरोपींची संख्या 32 झाली आहे. सुरूवातीला 13 आरोपींना अटक करण्यात आली असून रविवारी रात्री एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी, 14 एप्रिल रोजी रात्री 11 वाजाता आरपीआयच्या आठवले गटाची मिरवणूक तेलीखुंट परिसरात आली असताना अचानक जातीयवादी घोषणाबाजी व काही क्षणातच मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. यावेळी घटनास्थळी बंदोबस्ताला असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी जमावाच्या दिशेने जात असताना समाजकंटकांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. या दगडफेकीत काही युवकांसह पोलिस कर्मचार्‍यांना मुक्कामार व किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी त्यावेळी घटनास्थळावरून 13 जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना उपलब्ध व्हिडीओ व अन्य पुराव्यावरून आणखी 19 आरोपींचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. त्यातील एकाला रविवारी रात्री ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कोतवाली पोलीस ठाण्यात मिरवणुकीच्यावेळी दगडफेक व जातीय घोषणाबाजी संदर्भात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. रामनवमी व डॉ. आंबेडकर जयंतीदिनी जिल्ह्यात काही दुर्दैवी घटना घडल्या असल्या तरी पोलिसांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली, असा दावाही त्यांनी केला.

त्यात तथ्य नाही
काही दिवसांपूर्वी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी नगरमध्ये ’पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या गेल्या व त्याची ध्वनिचित्रफीत पोलिसांना दिली असा दावा केला होता, त्याबाबत बोलताना, पोलीस अधीक्षक पाटील यांनी, तपासात असे काही आढळले नाही, असे स्पष्ट केले. राहुरी तालुक्यातील धर्मांतराच्या तक्रारीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, यासंदर्भात महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाला असे आढळले नाही. दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्तांनी भोंग्याबाबत घेतलेल्या निर्णयाकडे लक्ष वेधले असता पाटील यांनी सांगितले की, आपण या संदर्भात लवकरच स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेऊ. धार्मिक स्थळी लावण्यात आलेल्या भोंग्यांसंदर्भात शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याची अहमदनगर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS