Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज्यातील राजकीय नाट्य  

महाराष्ट्र राज्यात सध्या ज्या काही घटना घडत आहे, आणि त्या विशेष म्हणजे एक्सपोज होत आहे, यामागची क्रोनोलॉजी समजून घेण्याची गरज आहे. राज्यातील लोकस

निवडणुका आणि लोकांचा सहभाग
पक्षफुटी आणि परतीचे दोर
बेजबाबदारपणाचे बळी !

महाराष्ट्र राज्यात सध्या ज्या काही घटना घडत आहे, आणि त्या विशेष म्हणजे एक्सपोज होत आहे, यामागची क्रोनोलॉजी समजून घेण्याची गरज आहे. राज्यातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर सर्वप्रथम अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नसल्याचा राजकीय विश्‍लेषकांचा दावा, त्यानंतर दादांची सुरू झालेली चलबिचल यातच सर्व काही आले. त्यानंतर पोर्शे कार अपघात झाल्यानंतर त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिस आयुक्तांना फोन केल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा दावा, त्यानंतर जरंडेश्‍वर कारखान्याची लागलेली चौकशी या सर्व बाबी पाहता या संपूर्ण घटनेला एक वेगळा रंग देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यामागची क्रोनोलॉजी समजून घेण्याची खरी गरज आहे.
वास्तविक पाहता महाराष्ट्रात अनेक दुर्घटना घडल्या. घाटकोपर दुर्घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर डोंबवली दुर्घटना घडली, यात 11 जणांचा मृत्यू झाला, तरी या घटना काही दिवसांतच नजरेआड करण्यात आल्या. खरंतर घाटकोपर दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू होऊनही त्याचे कुणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसून आले. आरोपीला अटक केली आणि प्रकरण पूर्ण दाबण्यात आले. डोंबवलीचे देखील तेच झाले. मात्र पुण्यातील पोर्शे कार दुर्घटना राजकारण्यांना पचवता आली नाही. घाटाकोपर दुर्घटना, डोंबवली दुर्घटना पचवण्यात आली, मात्र पोर्शे दुर्घटनेत मात्र राजकारण्यांना एक्सपोज करण्यात आले. आणि ते एक्सपोज करण्यासंदर्भातील माहिती अजितदादांच्या मित्रपक्षांनीच विरोधकांना पुरवण्याची पुरेपूर व्यवस्था करून ठेवली. त्यामुळेच या दुर्घटनेत आमदार सुनील टिंगरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस उपायुक्तांना फोन करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले. तसेच जरंडेश्‍वर कारखान्याची चौकशी या सर्व बाबी बघता अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडू नये, यासाठीच तर हा फास आवळला नसेल ना, असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे.

छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामागचे तीन मुख्य कारण सांगता येईल. घाटकोपर दुर्घटनेनंतर भुजबळांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली होती, ही सत्ताधार्‍यांची चूक असल्याची कबूली भुजबळांनी दिली होती. तर दुसरे कारण विधानसभेसाठी 80-90 जागांची मागणी भुजबळांनी केली होती. तिसरे कारण म्हणजे भुजबळांनी उघडपणे जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली होती. अजित पवार गटातील सर्वच आमदारांनी जितेंद्र आव्हाडांवर टीकेची संधी सोडली नसतांना भुजबळांनी पाठराखण करत उघड-उघड मनुस्मृतींचा विरोध करत आपला रोष प्रगट केला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची क्रोनोलॉजी समजून घ्याची असेल तर या प्रकरणांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कारण लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा उद्या पार पडणार असून, लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनरोजी लागणार आहे. यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडू शकते, आणि महायुतीमध्ये तणाव येवू शकतो, त्यामुळे महायुती विधानसभा निवडणुकीपर्यंत तुटणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे, त्यामुळेच जरंडेश्‍वर कारखाना प्रकरण असेल किंवा पोर्शे कार प्रकरण असेल, यासंदर्भातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र या पुराव्याचा वापर त्या निष्पाप जीवांना न्याय देण्यासाठी होणार नसून, त्या जोरावर पुढील राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी होणार आहे, यात शंका नाही. एका उद्योगपतींच्या मुलाला वाचवण्यासाठी किती जणांनी प्रयत्न केले, अर्थात हे प्रयत्न काही फुकट किंवा मित्र म्हणून केले नाही, तर त्यामागे मोठे आर्थिक गणित आहे, त्यासाठीच एवढी मोठी रिस्क उचलण्यात आलेली आहे. मात्र याप्रकरणाची देशभर वाच्यता झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्त आदेश दिल्यानंतर खर्‍या तपासाला वेग आला. मात्र या प्रकरणाचा शेवट काय होईल, याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. 

COMMENTS