अहमदनगर/प्रतिनिधी : सिव्हील जळीत कांडाचा पोलिस तपास थंडावला आहे. सिव्हील रुग्णालयात नेमकी आग कशामुळे लागली, यासंदर्भातील विद्युत विभागाच्या अहवालाची
अहमदनगर/प्रतिनिधी : सिव्हील जळीत कांडाचा पोलिस तपास थंडावला आहे. सिव्हील रुग्णालयात नेमकी आग कशामुळे लागली, यासंदर्भातील विद्युत विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार महिला कर्मचार्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून त्यांना अटक केल्यानंतर आता त्यांना जामीन झाला आहे तर निलंबित शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना अंतरिम जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या अर्जावरील न्यायालयीन सुनावणीकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे विद्युत विभागाचा अहवाल अद्याप आला नसल्याने पोलिस तपासात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. मात्र, राज्याच्या मुख्य विद्युत निरीक्षकांकडून आग कशामुळे लागली, याचे स्पष्टीकरण देणारा अहवाल पोलिसांना प्राप्त न झाल्याने तपासात अडचणी येत आहे. संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून देखील पोलिसांना अहवाल मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 6 नोव्हेंबर रोजी आग लागून सुरुवातीला 11 व नंतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता आगीतील बळींची संख्या 13 झाली आहे. सरकारने जिल्हा शल्य चिकित्सकांसह सहा जणांवर निलंबनाची कारवाई करत चौकशी समिती नियुक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एक वैद्यकीय अधिकारी, दोन परिचारिका व एक परिचारक यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधार घेऊन चार महिलांना अटक केली असली तरी यामध्ये खरे गुन्हेगार शोधण्यासाठी शासन नियुक्त चौकशी समिती व राज्याचा विद्युत विभाग यांचे अहवाल पोलिसांंच्या हाती येणे आवश्यक आहे. यानंतरच तपासाला गती मिळू शकते, त्यातून खरे गुन्हेगार समोर येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. घटना घडल्यानंतर लगेच राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक यांनी अतिदक्षता विभागाला भेट देत नोंदी घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांना अजून अहवाल दिला नसल्याने पोलिसांना पुढील तपास करण्यात अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, आगप्रकरणी जास्तीत जास्त जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. सुमारे 100 पेक्षा अधिक व्यक्तींचे जबाब नोंदविले जाणार आहे. घटना घडली त्यावेळी रुग्णालयात हजर असलेल्या डॉक्टर, कर्मचार्यांसह बाहेरच्या व्यक्तींचा यामध्ये जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डॉ. पोखरणा यांनी केले पुरावे सादर
जिल्हा रुग्णालयाचे निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना पोलिसांनी कलम 91 नुसार नोटीस सादर करून निर्दोषत्वाचे पुरावे घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले होते. डॉ. पोखरणा यांनी त्यांच्याकडील पुरावे पोलिसांना सादर केले असल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले. आता, तपासासाठी विद्युत विभागाचा अहवाल आवश्यक असून तो प्राप्त होण्याची वाट पाहत असल्याचेही उपअधीक्षक मिटके यांनी सांगितले.
अहवालातून आगीचे कारण येणार समोर
राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक यांनी जिल्हा रुग्णालयातील जळीत अतिदक्षता विभागाला भेट देऊन पाहणी केली. अतिदक्षता विभागामध्ये इलेक्ट्रीकचे काम अशा पद्धतीने झाले होते, याच्या नोंदी त्यांनी घेतल्या. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांना विद्युत विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मात्र 15 दिवस झाले तरी विद्युत विभागाचा अहवाल पोलिसांना मिळालेला नाही.
COMMENTS