आपल्या देशाचा इतिहास हा नेहमी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा राहिलेला आहे. क्रांती माणसाला स्वातंत्र, अधिकार, न्याय देत असते तर प्रतिक्रांती माणसाला गुला
आपल्या देशाचा इतिहास हा नेहमी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा राहिलेला आहे. क्रांती माणसाला स्वातंत्र, अधिकार, न्याय देत असते तर प्रतिक्रांती माणसाला गुलाम बनवत असते. प्रतिक्रांती मूठभर लोकांचे हित पाहणारी असते तर क्रांती हि सर्वांचे हित पाहणारी असते. आपल्या देशात प्रामुख्याने शिक्षणाची पहिली क्रांती केली ती फुले दाम्पत्यांनी. इथल्या ब्राम्हण व्यवस्थेने सर्वांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. शिक्षणाचा खरा अधिकार सर्वाना दिला तो महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी. या शिक्षणाच्या क्रांतीनंतर या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन क्रांत्या केल्या प्रामुख्याने केल्या आहेत. त्या म्हणजे, एक लोकशाही क्रांती तर दुसरी धम्म क्रांती. पण, जिथे क्रांती होत असते तिथेच प्रतिक्रांतीचे बीजारोपण होत असते हे त्याचे सूत्र आहे. आंबेडकरांनी जिथे धम्मक्रांती करून एक संस्कृती दिली तिथूनच आरएसएसची सांस्कृतिक चळवळ सुरु झाली आहे. आज त्यांची सत्ता आहे. फुले- आंबेडकरांच्या क्रांतीमुळे या देशातील बहुजन समाजाचा उद्धार झाला. तो उद्धार सामाजिक आहे. आर्थिक, राजकीय, बौद्धिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगानी हा बदल झाला. पण आज या फुले- आंबेडकरी चळवळीला कुणी पुढे घेऊन जात आहे का? याचे उत्तर नकारार्थी आहे.
आजच्या फुले- आंबेडकरी चळवळीला भूमिका आहे काय? असा प्रश्न चळवळीतील लोकांना विचारला तर त्यांची जीभ नक्कीच चाचरल्याशिवाय राहणार नाही. अपवाद सोडता आपल्या महाराष्ट्रातील बहुजनांच्या कोणत्या नेत्याला भूमिका आहे? ज्यांना भूमिका आहे त्यांना राजकारणात टिकू दिले जात नाही. चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे आजच्या काळातील चित्र फार वाईट आहे. आपण ज्या फुले- आंबेडकरी चळवळीत काम करतो त्या चळवळीचे वैशिष्ठे काय आहेत? हेच या कार्यकर्त्यांना समजत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना भूमिकाच नाही. ज्यांच्याकडे भूमिका आहे त्यांच्याकडे प्रामाणिकपणा नाही. आजच्या विचारवंतांकडे देखील भूमिकेच्या प्रामाणिकपणाचा अभाव आपल्याला जाणवतो. फुले- आंबेडकरांनी ज्या चळवळी चालवल्या त्या आज पुढे घेऊन जातांना कुणी दिसत नाही. फुले- शाहू- आंबेडकर चळवळीला पूरक घटक कोणते आहेत आणि त्याच्या बाजूने आज कोण उभे आहे? चळवळीला मारक घटक कोणते आहेत? हे आजच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना समजत नाही.
आपल्याकडे फुले- आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. पण त्या संघटनेच्या भूमिका तिच्या उद्दिष्ठासी निगडीत दिसत नाहीत. फुले- आंबेडकरांची एक भूमिका होती. इथली विषमतावादी जातीव्यवस्था नष्ट करण्याची ती भूमिका होती. आजच्या या विचारधारेच्या कार्यकर्त्यांना या जातिव्यवस्थेचे आकलन आहे का? जर या जातिव्यवस्थेचे आकलनच नसेल तर हा जातिव्यवस्थेचा डोलारा हे कार्यकर्ते कसा उध्वस्त करणार आहेत? जे नष्ट करायचे आहे त्याचे अगोदर आकलन आवश्यक असते. त्याचा पाया काय आहे त्याचे आकलन असावे लागते. मग त्याच्या मुळात काय आहे त्याचे आकलन करून घ्यावे लागते. आणि मग नंतर ते मुळातून उध्वस्त करता येत असते. एखादा लाकूडतोड्या झाड तोडतांना त्या झाडाचे निरीक्षण करतो. त्याचा आकार, उकार, त्याची वैशिष्ठे, त्याच्या फांद्या, पाले, मुळे याचा अभ्यास करून ते झाड कोणत्या दिशेला पाडायचे आहे, हे ठरवून त्या झाडाच्या फांद्याला दोर बांधून नंतर त्याच्या मुळावर घाव तो लाकूडतोड्या घालत असतो. ज्या दिशेला त्याला ते झाड पाडायचे आहे त्याबद्दल त्याच्या मनात प्रचंड विश्वास असतो. पण आपल्या चळवळीच्या आजच्या कार्यकर्त्यांना सध्याच्या जातीच्या डोलाऱ्याला उध्वस्त करायचे आहे पण त्याच्याकडे काय- काय साधन सामुग्री आहे? तर काहीच नाही. ना धड आकलन, ना धड धोरण. तो चाललाय ते जातीचं झाड तोडायला. त्याच्याकडे दोरही नाही. मग ते झाड तोडतांना अंगावर पडले तर काय करायचं? अशी सगळी या चळवळीतील कार्यकर्त्यांची अवस्था आहे. त्यामुळे आजच्या फुले- आंबेडकरी चळवळीचे काय आहे बुवा? तर आजच्या या कार्यकर्त्यांनी ज्या व्यवस्थेचा डोलारा उध्वस्त करायचा आहे त्याचा नीट अभ्यास करावा हि अपेक्षा.
COMMENTS