श्रीगोंदा शहर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 मधील गाळप केलेल्या पाच लाख 85 हजार 740 मे. टनाचे रूपये 2700 प्र.
श्रीगोंदा शहर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 मधील गाळप केलेल्या पाच लाख 85 हजार 740 मे. टनाचे रूपये 2700 प्र. मे. टनाप्रमाणे संपूर्ण पेमेंट ऊस पुरवठादार सभासद शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग केले असून उर्वरित रक्कम दीपावली पूर्वी अदा केली जाणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी केले.
कारखान्याच्या सन 2024-25 गळीत हंगामाच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी मिल रोलर पूजन समारंभात नागवडे बोलत होते. प्रथम कारखान्याचे संचालक योगेश भोईटे व संदीप औटी यांच्या शुभहस्ते रोलरची विधीवत पूजा करण्यात आली . तदनंतर व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नागवडे पुढे म्हणाले की, स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा आणि वसा घेऊन कारखान्याचे संचालक मंडळ सभासद, शेतकरी व कामगार यांच्या हिताला सातत्याने प्राधान्य देऊन काटकसरीने कारभार करत आहे. मार्च महिन्यातील ऊस गाळपाचे प्र.मे.टन रु. 2700 याप्रमाणे सर्व पेमेंट कारखान्याने बँकेत वर्ग केले असल्यामुळे सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी यांच्यामध्ये समाधानाचे व विश्वासाचे वातावरण तयार झालेले आहे. सध्या सहकारी साखर कारखान्यांसमोर अनेक अडचणी आहेत. तरीही नागवडे कारखाना ऊस दराबाबत कधीही मागे राहिलेला नाही व उद्याच्या काळातही राहणार नाही. आज रोलर पूजन झाले म्हणजे गळीत हंगामाची तयारी वेगाने करावी लागणार असून सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण होणे गरजेचे आहे. कारखान्याचे उच्चांकी गाळप करण्याकरिता ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी सहकार्य करावे असे आवाहन नागवडे यांनी केले. अध्यक्षपदावरून बोलताना बाबासाहेब भोस म्हणाले की, गतवर्षी अनेक संकटांवर मात करून राजेंद्र दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने 6 लाखापर्यंत गाळप करण्याचा प्रयत्न केला परंतु उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. चालू वर्षी मात्र गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे करिता आपल्यातील त्रुटी दूर करून सर्वांनी एक दिलाने काम करावे. नागवडे कारखान्याने आज अखेर सभासद, कामगार, शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, व्यापारी यांना केंद्रस्थानी मानून योग्य न्याय दिलेला आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारी स्वीकारून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भोस यांनी केले. कार्यक्रमास संचालक सर्वश्री सुभाष शिंदे, श्रीनिवास घाडगे, भाऊसाहेब नेटके, शरद जगताप, डी. आर. आबा काकडे, प्रशांत शिपलकर, विश्वनाथ गिरमकर, विठ्ठल जंगले, सावता हिरवे, बंडू जगताप, लक्ष्मण रायकर, भाऊसाहेब बरकडे, ह.भ.प. भाऊसाहेब मासाळ, प्र. कार्यकारी संचालक सतीश जांभळे व, चीफ इंजिनिअर दत्तात्रय तावरे, प्रोडक्शन मॅनेजर नाना कळमकर, मुख्य शेतकरी सचिन बागल तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कामगार उपस्थित होते. भाऊसाहेब बांदल यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले तर संचालक सावता हिरवे यांनी आभार मानले.
COMMENTS