'माधव' समीकरण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खासकरून महाराष्ट्रात निर्माण केले होते. या केलेल्या समीकरणातून ज्या तीन नेतृत्वांचा महाराष्ट्रात भा

‘माधव’ समीकरण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खासकरून महाराष्ट्रात निर्माण केले होते. या केलेल्या समीकरणातून ज्या तीन नेतृत्वांचा महाराष्ट्रात भारतीय जनता प्षाच्या माध्यमातून उदय झाला होता; त्यामध्ये माळी समाजाचे ना. स. फरांदे, धनगर समाजाचे अण्णासाहेब डांगे आणि वंजारी समाजाचे दिवंगत गोपीनाथ मुंडे. या तिघांनीही भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जे नेतृत्व प्रदान केलं, त्यामुळे महाराष्ट्रातला सामाजिक आधार भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात मिळाला. त्याची परिणती १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती सत्तेवर येण्यात झाली होती. मात्र, यातील आता तिघेही नेते जवळपास पक्षाच्या समीकरणात नव्हते. त्यातले गोपीनाथ मुंडे हे तर दिवंगत झाले. त्यातील अण्णासाहेब डांगे यांनी आता वर्षानंतर भारतीय जनता पक्षात आपल्या मुलांसह प्रवेश घेतला आहे.
२३ वर्षापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. आज २३ वर्षांनी त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामध्ये त्यांनी बोलताना एक खंत व्यक्त केली की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करायचे होते; हे समीकरण जेव्हा बाहेर आलं, तेव्हापासून आपल्यावर पक्षांतर्गत अन्यायाला सुरुवात झाली. सरतेशेवटी आपण पक्षातून बाहेर पडलो! मात्र, पुन्हा स्वगृही आल्यानंतर जो आनंद होतोय, तो त्यांनी शब्दात व्यक्त केला. त्यांचे त्यांच्या मुलाने म्हणजे त्यातील चिमण डांगे यांनी दिवसांचा हिशोब करत ८ हजार दिवसानंतर भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळेच आमचा विचार झाला आणि त्यामुळे आता आम्हाला बरं वाटलं आणि खूप आनंदही झाला, असं मत त्यांनी व्यक्त केले. राजकारणामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आनंदाची बाब म्हणून निश्चितपणे समोर येतात. पण, आता महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने अण्णासाहेब डांगे यांच्या माध्यमातून उभा राहिला होता; त्या समाजाची राजकीय सत्तेतील ससेहोलपट आजही सुरूच आहे! नाही म्हणायला, गोपीचंद पडळकर यांना सत्तेचा सहभाग देण्यात आलेला आहे. परंतु, त्यांचा अधिकाधिक वेळ हा ओबीसी आमदारांच्या अंतर्गत संघर्षामध्येच चालला आहे. अर्थात, अण्णा डांगे यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे ताकद मिळेल, हे नाकारता येत नाही. परंतु, याचे श्रेय खऱ्या अर्थाने जर कोणाला द्यायचं असेल तर ते कल्पक आणि व्यापक जनाधार वाढवण्याच्या दृष्टीने कार्यरत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला द्यावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना एका बाजूला राज्याच्या सत्तेची धुरा हाकतात, तर, दुसऱ्या बाजूला पक्ष हा कसा स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल, याची जुगाळणी देखील ते आपल्या राजकीय संघटन कौशल्यातून करत असतात. ते कौशल्य त्यांनी पुन्हा अण्णा डांगे आणि त्यांच्या कुटुंबाला पक्षात आणून दाखवून दिलेला आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे सत्तेतील असेल किंवा पक्षातील असेल, दोन्ही प्रकारचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच होत आहे. पक्षाला राज्यामध्ये मोठे बळ मिळत असताना दिसत आहे. अर्थात, या काळामध्ये अनेक जातीसमह राजकीय दृष्ट्या जागृत होत असल्यामुळे, तेही सत्तेत आपला वाटा मागण्यासाठी पुढे येत आहेत. अशा प्रत्येक समाज घटकाला सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे नेहमीच पुढाकार घेतात.

COMMENTS