जालना ः राज्यात आरक्षणाच्या प्रश्नांवरून सरकारची चांगलीच कोंडी झाली असतांना, शुक्रवारी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी नेत्यांनी एल्गार मोर्चा
जालना ः राज्यात आरक्षणाच्या प्रश्नांवरून सरकारची चांगलीच कोंडी झाली असतांना, शुक्रवारी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी नेत्यांनी एल्गार मोर्चा काढला. यावेळी बोलतांना ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला कुणबी दाखले देवून त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देवू नका, राज्य सरकारने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडू नये. ओबीसींच्या आरक्षणात आणखी वाटकेरी निर्माण होवू देणार नाही, असा इशारा भुजबळ यानीं दिला.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, याच जालन्यात 6 जून 1993 रोजी महात्मा फुले समता परिषदेने लाखोंच्या संख्येने मोर्चा काढला होता. तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मी त्या मंत्रिमंडळात होतो. विलासराव देशमुख आणि शिवाजीराव देशमुखही त्या मंत्रिमंडळात होते. आम्ही सर्वांनी शरद पवारांकडे एकमुखाने मागणी केली की ओबीसींना आरक्षण द्या, मंडल आयोग लागू करा. याच जिल्ह्यात शरद पवारांनी आमची ती मागणी पूर्ण करण्याचे वचन दिले. हल्ली अनेक जण सांगतात की शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिले आणि आमचे नुकसान केले. परंतु, मी शरद पवारांबद्दल एवढंच सांगेन शरद पवारांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. तेव्हा व्ही. पी. सिंह देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारला. मंडल आयोगाच्या अहवालानुसार ओबीसींना 27 टक्के आरक्षण द्यायला हवं. त्यानुसार निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी भुजबळ यांनी सांगितले. यावेळी विविध पक्षातील ओबीसी नेते, आमदार उपस्थित होते. शिवाय एल्गार मोर्चासाठी विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुजबळांनी घेतला मनोज जरांगेंचा समाचार- अंबडच्या सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय ऐकरी उल्लेख करतही बोचरी टीका केली. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, नेते झाले, गावे झाली. आता देवांवरही ह्यांनी हक्क सांगायला सुरुवात केली. पंढरपूरला अजित पवारांनी यायचे नाही का? पंढरपूरचा राजा सर्वांचा आहे. कारण तुम्ही आरक्षण देत नाही. पूजेचा आणि आरक्षणाचा काय संबंध असा सवालही भुजबळांनी केला. गावागावात लागलेले गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. ही लोकशाही आहे. राज्यात सरकार आहे की नाही? मंत्र्यांना गावबंदी, आमदारांना गावबंदी महाराष्ट्र काय तुमच्या सातबार्यावर लिहून दिला का रे? पाचवी शिकला की नाही माहीत नाही आणि ह्याला न्यायमूर्ती सर, सर म्हणतायत. खूप बोललास तू माझ्याबद्दल. पण याद राख, माझ्या शेपटावर पाय देण्याचा प्रयत्न करू नकोस, असा इशाराही भुजबळांनी दिला आहे.
लहान भावाच्या ताटातले ओरबडू नका ः वडेट्टीवार- राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसी एल्गार मोर्चाला संबोधित करतांना म्हणाले की, या 350 जातीच्या समूहाची पिढ्यान पिढ्यांची जमीन कमी झाली, माझी लेकरे गरीब झाले म्हणून सांगत आहेत. तुमच्या जमीनी पिढीजात कमी झाल्या असतील, पण पिढ्यानपिढ्या ज्याच्याकडे जमिनीच नाहीत त्यांची व्यथा काय असेल याचा विचार तुम्ही करा. 20-50 एकरचा शेतकरी आज पाच एकरवर आला असेल, पण ज्याच्याकडे दोन एकरही नाही तो वीस पिढ्यांतही कुठे असेल याचा विचार तुम्ही करणार नाही? तुम्ही स्वतःला मोठा भाऊ म्हणता. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखे वागले पाहिजे. लहान भावाच्या ताटातले ओरबडायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.
COMMENTS