Homeअग्रलेख

अविश्‍वास प्रस्ताव आणि विरोधकांची कसोटी !

भारतीय लोकशाहीचे केंद्रबिंदू असलेल्या संसदेत घडणार्‍या प्रत्येक घटनेचे दूरगामी परिणाम असतात. लोकसभेतील अध्यक्षपद हे केवळ एका व्यक्तीचे पद नसून ते

लोकसभेत गदारोळात धन्यवाद प्रस्ताव मंजूर
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ
लोकसभेतील गोंधळ चिंताजनक !

भारतीय लोकशाहीचे केंद्रबिंदू असलेल्या संसदेत घडणार्‍या प्रत्येक घटनेचे दूरगामी परिणाम असतात. लोकसभेतील अध्यक्षपद हे केवळ एका व्यक्तीचे पद नसून ते संपूर्ण संसदीय व्यवस्थेच्या निष्पक्षतेचे प्रतीक आहे. अशा या महत्त्वाच्या पदाविरोधात 118 विरोधी खासदारांनी अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस देणे ही घटना केवळ राजकीय वादापुरती मर्यादित नाही; ती लोकशाहीतील संवाद, विश्‍वास आणि संस्थात्मक संतुलन यांच्या स्थितीचेही द्योतक आहे.
9 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत घडलेली घटना या वादाचा प्रारंभबिंदू ठरली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात आरोप केला की, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना अर्थसंकल्पापूर्वी काही मुद्द्यांवर बोलण्याची वैयक्तिक हमी दिली होती, परंतु त्यानंतर त्यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानी ओम बिर्ला नसून भाजप खासदार संध्या राय होत्या आणि त्यांनी राहुल गांधींना बोलण्याची परवानगी दिली नाही. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही अध्यक्षांनी कोणतेही वचन दिले नसल्याचे स्पष्ट केले. या घटनांनंतर सभागृह स्थगित झाले आणि दुसर्‍या दिवशी अध्यक्ष अनुपस्थित असताना विरोधकांनी अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस दिली. भारतीय संविधानाच्या कलम 94 नुसार, लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी लोकसभेतील सदस्यांना ठराव मांडता येतो. यासाठी किमान 14 दिवसांची नोटीस आवश्यक असते. वास्तविक पाहता या अविश्‍वास ठरावाविरोधात विरोधकांची मोठी कसोटी लागणार आहे. कारण संख्याबळ. सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे सहयोगी मिळून स्पष्ट बहुमतात आहेत. त्यामुळे केवळ 118 सदस्यांच्या पाठिंब्याने अविश्‍वास प्रस्ताव यशस्वी होणे अवघड आहे. मग प्रश्‍न उरतो-बहुमत नसतानाही विरोधकांनी हा प्रस्ताव का आणला? विरोधकांचे म्हणणे आहे की लोकसभेत त्यांचा आवाज सातत्याने दाबला जात आहे. राहुल गांधींना पूर्ण भाषण करू न देणे, विरोधी खासदारांचे निलंबन, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांवर कारवाई न होणे आणि काँग्रेस खासदारांवर पंतप्रधानांवर हल्ल्याचे आरोप लावणे-या चार मुद्द्यांवर त्यांनी अध्यक्षांची निष्पक्षता प्रश्‍नांकित केली आहे. लोकसभा अध्यक्षांची भूमिका परंपरेने पक्षनिरपेक्ष मानली जाते. अध्यक्ष निवडून आल्यानंतर ते पक्षीय राजकारणापासून दूर राहून सर्व सदस्यांना समान वागणूक देतात, अशी अपेक्षा असते. ब्रिटिश संसदीय परंपरेतून आलेल्या या संकल्पनेत अध्यक्ष हे सभागृहाचे रक्षक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या निर्णयांवर पक्षपातीपणाचा आरोप होणे ही गंभीर बाब आहे. विरोधकांनी अविश्‍वास प्रस्ताव आणून संख्यात्मक विजय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हणणे सोपे आहे; पण त्यामागे राजकीय संदेश देण्याची रणनीती अधिक स्पष्ट दिसते. हा प्रस्ताव म्हणजे सत्ताधार्‍यांविरोधातील थेट संघर्ष नसून, संसदीय पद्धतीत निष्पक्षतेच्या मागणीचा औपचारिक उच्चार आहे. संसदेत नोंद होणारा हा ठराव इतिहासातही नोंदवला जाईल. त्यामुळे विरोधक आपली भूमिका अधिकृतरीत्या मांडू इच्छितात. सत्ताधारी पक्षाने या आरोपांना फेटाळले आहे. त्यांचे म्हणणे आहे की,  अध्यक्षांनी नियमांनुसार निर्णय घेतले असून, सभागृहातील शिस्त राखण्यासाठी काहीवेळा कठोर पावले उचलावी लागतात. निलंबनाची कारवाईही संसदीय नियमांनुसारच झाली, असा त्यांचा दावा आहे.
अध्यक्षांनी काँग्रेस खासदारांवर पंतप्रधानांवर संभाव्य हल्ल्याचा आरोप केल्याचे विधानही सुरक्षा माहितीच्या आधारे केले असल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रश्‍न निर्माण होतो अध्यक्षांचे निर्णय नियमांनुसार असले तरी त्यांची धारणा निष्पक्ष आहे का? संसदीय नियम हे केवळ कायदेशीर चौकट देतात; परंतु त्यांची अंमलबजावणी करताना समतोल, संयम आणि सर्व पक्षांचा विश्‍वास महत्त्वाचा असतो. भारतीय संसदेच्या इतिहासात अध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव अत्यंत दुर्मिळ आहेत. कारण अध्यक्षपदाची प्रतिष्ठा राखणे ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी मानली जाते. अध्यक्षांवर अविश्‍वास व्यक्त करणे म्हणजे संपूर्ण सभागृहाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उभे करणे होय. लोकशाही ही केवळ बहुमताची सत्ता नाही; ती अल्पमताच्या आवाजाचाही सन्मान करते. विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात असल्याची भावना निर्माण झाली तर लोकशाहीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याच वेळी, सभागृहातील गोंधळ, घोषणाबाजी आणि नियमभंग रोखण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असते. या दोन्ही टोकांमध्ये संतुलन साधणे हे अत्यंत कठीण कार्य आहे. संख्याबळाचा विचार करता, सध्या अध्यक्षांची खुर्ची तात्काळ धोक्यात असल्याचे दिसत नाही. सत्ताधारी आघाडीचे बहुमत ठोस आहे. त्यामुळे अविश्‍वास प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, राजकीय दृष्टिकोनातून हा प्रस्ताव अध्यक्षांच्या प्रतिमेवर आणि संसदीय वातावरणावर परिणाम करू शकतो. जर चर्चा तीव्र झाली आणि काही सहयोगी पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली, तर सत्ताधार्‍यांसाठी नैतिक दबाव निर्माण होऊ शकतो. परंतु सध्याच्या घडीला हा प्रस्ताव अधिक प्रतीकात्मक स्वरूपाचा दिसतो-लोकशाहीतील असंतोषाचे औपचारिक प्रकटीकरण. या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा धडा समोर येतो-संसदीय परंपरा आणि संवाद यांचे जतन करणे अत्यावश्यक आहे. अध्यक्षांनी सर्व पक्षांचा विश्‍वास मिळवण्यासाठी अधिक पारदर्शकता आणि संवादाची भूमिका स्वीकारली पाहिजे. विरोधकांनीही सभागृहातील नियमांचे पालन करत आपली भूमिका ठामपणे मांडावी. लोकसभा ही देशाच्या जनतेची प्रतिनिधी संस्था आहे. येथे होणारे वाद, मतभेद आणि संघर्ष हे लोकशाहीचे अंग आहेत; परंतु ते संस्थात्मक मर्यादेत आणि परस्पर सन्मान राखून व्हावेत, ही अपेक्षा असते. अध्यक्षांविरोधातील अविश्‍वास प्रस्ताव हा केवळ एका व्यक्तीविषयीचा प्रश्‍न नाही; तो संसदीय संस्कृतीच्या दिशेबाबतचा संकेत आहे. शेवटी, लोकशाहीची खरी ताकद ही संस्थांवरील विश्‍वासात आणि संवादाच्या संस्कृतीत असते. हा विश्‍वास टिकवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक-दोघांनीही संयम, पारदर्शकता आणि परस्पर आदर यांचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. अन्यथा अविश्‍वास प्रस्ताव हे केवळ संसदीय साधन न राहता, राजकीय संघर्षाचे प्रतीक बनू शकतात-आणि ते लोकशाहीच्या आरोग्यासाठी हितावह ठरणार नाही.

COMMENTS