राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला अस्मान दाखवल्यानंतर आता 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे पुन्हा एकदा भ
राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला अस्मान दाखवल्यानंतर आता 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरोधात महाविकास आघाडी सामना रंगणार आहे. या सामन्यात देखील भाजप महाविकास आघाडीला अस्मान दाखवण्यास इच्छूक आहे. त्यामुळे राज्यसभेची पुनरावृत्ती विधानपरिषदेत बघायला मिळाली तर नवल नको. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना गाफील राहिल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. मात्र या निवडणुकीत ती किंमत काँगे्रसला मोजावी लागू शकते. निवडणूक जिंकण्यासाठी केवळ रणनीती आखून चालत नाही, तर विरोधक कोणती चाल टाकणार आहे, त्याचे भान देखील असावे लागते, आणि विरोधकांना मात देण्यासाठी तसे सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी लागते, याचे भान सत्तेत असलेल्या आघाडीतील पक्षांना अद्याप तरी दिसून येत नाही. आपला उमेदवार विजयी होतो ना, मित्रपक्षाचा पडला, तर पडला, असा अविर्भाव सध्या मित्रपक्षांत दिसून येत आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँगे्रसने आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा, अशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची इच्छा होती. मात्र काँगे्रसचे आक्रमक नेतृत्व नाना पटोले यांनी यास नकार दिला. त्यामुळे निवडणूक अटळ बनली. त्यामुळे पुन्हा एकदा घोडेबाजार यानिमित्ताने बघायला मिळू शकतो. विधानपरिषदेसाठी 27 मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रत्येकी दोन तर भाजपचे चार आणि काँगे्रसचे एक उमेदवार सहज निवडून येतील. तर काँगे्रसचा दुसरा उमेदवार निवडणून येण्यासाठी10 अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. अशावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अपक्ष आमदार काँगे्रसला मतदान करणार का, याचे उत्तर निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत गुप्त मतदान होणार असल्यामुळे काँगे्रसला आपले आमदार आपल्याच उमेदवाराला मतदान करतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे या निवडणुकीत देखील भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. दहाव्या जागेवर काँगे्रसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. यात प्रसाद लाड उजवे ठरू शकतात. कारण प्रसाद लाड आर्थिकबाबतीत सक्षम असून, आमदार फोडण्यात ते उजवे ठरतात. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत नाराजीचा फटका त्यांच्या उमेदवारांना बसू शकतो. शिवसेनेचे सचिन अहिर आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांची जागा यामुळे धोक्यात येऊ शकते. सचिन अहिर हे शिवसेनेचे पहिल्या पसंतीचे तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे दुसर्या पसंतीचे उमेदवार आहेत. मात्र, दोन्ही पक्षातील अंतर्गत नाराजी खडसे आणि अहिर यांना भोवू शकते. याचे कारण म्हणजे हे दोन्हीही उमेदवार कानामागून आले आणि तिखट झाले असेच आहेत. खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये तर अहिर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेते आले आहेत. मात्र अहिर यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली हक्काची आणि सुरक्षित समजला जाणारा वरळी मतदारसंघ सोडला होता. त्यामुळे अहिर यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. त्यामुळे अहिर यांना दगाफटका होण्याची शक्यता तशी कमीच आहे. मात्र खडसे किंवा हंडोरे यापैकी एकाला मात्र दगाफटका सहन करावा लागू शकतो. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे पहिल्या पसंतीचे तर चंद्रकांत हंडोरे हे दुसर्या पसंतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. भाई जगताप दोन वेळा विधानपरिषेवर निवडून गेले आहेत. आर्थिकदृष्ट्या ते सक्षम असलेले उमेदवार आहेत. तर दलित चेहरा असलेले चंद्रकांत हंडोरे यांनी काँग्रेसकडून मंत्रिपद भूषवले आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारात लढत असणार आहे. त्यामुळे हंडोरे आणि भाजपचे आर्थिकदृष्ठ्या पॉवरफुल असलेले प्रसाद लाड यांच्यात लढत झाल्यास हंडोरे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण जाऊ शकते. मात्र राज्यसभेसारखीच ही निवडणूक देखील रंगत वाढवणारी आहे. यातून महाविकास आघाडीचे सरकारला किती अपक्ष आणि छोटया पक्षाचा पाठिंबा आहे, याचे उत्तर देखील या निवडणुकीतून स्पष्ट होईल.
COMMENTS