महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकीय परंपरा कायम राहिलेली आहे की, राज्याचे राजकारण कायम वैचारिक आधारावर केले जाते. म्हणजे काँग्रेस असो, भाजपा असो,

महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकीय परंपरा कायम राहिलेली आहे की, राज्याचे राजकारण कायम वैचारिक आधारावर केले जाते. म्हणजे काँग्रेस असो, भाजपा असो, शिवसेना असो, रिपब्लिकन, समाजवादी पक्ष असो, बहुजन समाज पक्ष असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो या सगळ्याच पक्षांनी राजकीय विचारधारा कायम जपली आहे. परंतु, महाराष्ट्राचे आणि देशाचेही ज्येष्ठ राजकीय नेते असलेले शरद पवार यांनी आजपासून २५ वर्षांपूर्वी स्वतःचा पक्षही काढला. परंतु, कोणतीही विचारधारा त्यांनी आधार बनवली नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पक्षाची दोन शकले झाली. पक्षाची झालेली ही दोन शकलं, हे वास्तव नसून, खरं वास्तव आहे की, शरद पवार हे कायम सत्तेच्या शोधात असतात. गेली दहा-बारा वर्ष ते भाजप अथवा महायुतीच्या सत्ता काळात देखील सत्तेच्या अवतीभवती राहण्यातच मश्गूल राहिलेले आहेत. आता त्यांचे दोन्ही राष्ट्रवादी गट हे एकत्रच येणार नाहीत; तर, थेट सत्तेत शिरकाव करणार असल्याचा गौप्यस्फोट प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. अर्थात, या म्हणण्यात तथ्य नाही, असे कोणीही म्हणू शकत नाही! शरद पवार यांच राजकारण कधीही राजकीय विचारधारेच्या अनुषंगाने राहिलेलं नाही. आम्ही यापूर्वी अनेक वेळा लिहिलं होतं की, २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये उभे राहत, त्यांनी शिवसेनेला बाजूला फेकले होते. भाजपला सत्तेसाठी विनाशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर २०१९ मध्ये आपण पहाटेचा शपथविधी देखील पाहिला होता. त्यांच्या पक्षाची झालेली दोन शकलं आणि काका पुतण्यांचे झालेले दोन गट, हे केवळ बाहेर दिसायला आहेत; परंतु, आतून हे दोन्हीही गट सत्तेच्या अनुषंगाने आपली वाटचाल करित असल्याचं दिसायल लागले आहे. आता लवकरच या दोन्ही गटांचं केवळ एकत्रीकरणच होणार नाही, तर, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील आणि रोहित पवार हे अनुक्रमे केंद्र आणि राज्यात सत्ताधारी मंत्री झालेले दिसतील, असा दावाच ओबीसी राजकीय लढ्यातील नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. याचाच अर्थ, ओबीसींना आता राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना, शरद पवार यांची ही खेळी ओबीसींच राजकीय समीकरण बिघडवणारी आहे. अर्थात, प्रा. लक्ष्मण हाके यांनी खुल्या पद्धतीने दावा केला आहे की, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे काही ओबीसी नेत्यांना डावलले जाणार आहे. या म्हणण्यात बरेच तथ्य आहे. शरद पवार हे केवळ सत्तेची आस असलेली नेते असून, कोणतीही विचारधारा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कधी झळकली नाही. स्वतःला ते पुरोगामी किंवा फुले शाहू आंबेडकरवादी म्हणत असले, तरी, त्याहीदृष्टीने त्यांचं राजकारण दिसले नाही. त्यांचे राजकारण हे केवळ सत्ता लोलूप असण्यापेक्षा वेगळं काही नाही! शिवसेना या पक्षाने शरद पवार यांच्या नादी लागून, त्यांची विचारधारा सोडली आणि त्यामुळे ओबीसींच्या जीवावर मोठा झालेला हा पक्ष, आज अस्ताव्यस्त झालेला आहे. या पक्षाचे स्वरूप म्हणून आपण दोन्ही गटांकडे पाहिलं, तर, ओबीसी समाजाचा मुख्य असणारा हा पक्ष आज त्यांची त्रेधातिरपीट किंवा ससेहोलपट करीत आहे. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागा, राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून मिळतील अशी अपेक्षा निर्माण झाली असताना, ओबीसींना कोणत्याही प्रकारचं राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मिळू द्यायचं नाही, याचा चंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पवार गटांनी बांधलेला आहे. त्यांचं एकत्रीकरण होणं हे ओबीसींच्या राजकीय हक्कांवर गदा आणण्याचं एक षडयंत्र आहे, या पलीकडे काही नाही!
COMMENTS