Homeताज्या बातम्यासंपादकीय

नवरात्र उत्सव धर्माचा नव्हे, बहुजनांचा!

आगामी नवरात्रीच्या निमित्ताने गरबा या लोकप्रिय नृत्य प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रत्यक्षात हिंदू असल्याचा दाखला दिल्याशिवाय तरूण-तरूणींना प्रवेश

जहाजाला छिद्र अन् उंदरांची दाणादाण ! 
भाग बाजार निवडणूक निकालांचा निर्देशक !
आंदोलन, हल्ला आणि हिरोगिरी! 

आगामी नवरात्रीच्या निमित्ताने गरबा या लोकप्रिय नृत्य प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रत्यक्षात हिंदू असल्याचा दाखला दिल्याशिवाय तरूण-तरूणींना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका महाराष्ट्रातील काही किरकोळ राजकारण्यांनी घेतलेली आहे. परंतु, ही भूमिका या किरकोळ राजकारण्यांची नसून, एकूणच संघ परिवाराची ही भूमिका आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने देखील यावर आता आपली भूमिका मांडली आहे. मुळातच नवरात्र उत्सव हा कोणत्याही प्रकारे हिंदुत्ववादी उत्सव नाही. कारण, हा उत्सव शेतीशी जुळलेला एक सांस्कृतिक उत्सव आहे. शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रीने हा उत्सव सुरू केला आहे. समाजातील कोणताही सांस्कृतिक उत्सव समाजाला सधन असल्याशिवाय निर्माण करता येत नाही. त्यामुळे शेतीप्रधान असणाऱ्या समाजाला शेतीच्या हंगामात मिळणारी एक मोकळीक आणि तो हंगाम साजरा करण्यासाठी व्यक्त केला जाणारा आनंद, हा नृत्य आणि गाण्याच्या प्रकारातून अभिव्यक्त करावा यातून नवरात्रीचे वेगवेगळे उत्सव जन्माला आले आहेत. पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये काली दुर्गा चा महोत्सव, हा शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रीच्या मुलीचा आहे, असं आजही तिथे मानले जाते. तर, हा उत्सव देशातील इतर राज्यांमध्येही वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुजरात मध्ये सधन असणाऱ्या बहुजन समाजाला याच हंगामात मिळणारी मोकळीक आणि खासकरून स्त्रियांना आपली अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी हा एक चांगला हंगाम असतो. गुजरात सारख्या राज्यामध्ये गरबा हे नृत्य लोकप्रिय झालं. गाणे आणि तालबद्ध वाद्य याच्या बिट्सवर केलं जाणार वैविध्यपूर्ण गरबा हे नृत्य, आता आधुनिक काळात तरुण-तरुणींमध्ये लोकप्रिय झाले आहे. कारण, आजचा तरुण हा कोणत्याही बाबतीत जात आणि धर्माच्या अनुषंगाने विचार करत नाही. अतिशय क्लिष्ट असलेल्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये या तरुणांना एक विरंगुळा हवा असतो. तो विरंगुळा आनंदाच्या रूपात साजरा करण्याची ते भूमिका घेतात. त्यातूनच कोणत्याही जाती धर्माचे तरुण-तरुणी असतील तरी, अशा उत्सवांमध्ये जागतिकीकरणाच्या काळात सहभागी व्हायला लागले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मग अशा वेळी संघ परिवारातील काहींच्या भूमिका जर अधिक कठोरपणे येत असतील, तर, त्या निश्चितच स्वागतार्ह नाहीत. कारण, समाज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेकडे जात असताना त्याला असा संकुचित करण्याची प्रक्रिया, ही आजच्या काळात यशस्वी होऊ शकत नाही. जागतिकिरणाच्या आणि वैश्विक या काळामध्ये धर्म हा संकुचित प्रकार घेऊन, कोणालाही आता बंदिस्त करता येणार नाही, हे साऱ्या जगाने ओळखले आहे. अशा वेळी भारतातल्या उस्फुर्त भावना असलेल्या तरुण-तरुणींना देखील यापासून आपल्याला परावृत्त करता येणार नाही. एकंदरीत गरबा हा खेळ आणि नृत्य प्रकार आजच्या पिढीमध्ये लोकप्रिय होत असताना किंवा झाला असताना, त्यांची इच्छा असेल तर त्यांना सहभागी होण्याचा अधिकार भारतीय संविधान स्वातंत्र्य म्हणून देतं. हे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार कोणत्याही संघटनेला किंवा सांस्कृतिक चळवळीला नाही, हे तितक्याच स्पष्ट शब्दात आज बजावणे गरजेचे आहे. समाजव्यवस्था ही कायम संघर्षरत असली तरी, कोणत्याही काळात ती जर अधिक सनातन होत असेल तर, त्या प्रक्रिया समाज  झुगारून देतो, हा आधुनिक काळाचा एक संदेश आहे. आगामी नवरात्र उत्सवात तरुण-तरुणी जर गरबा खेळासाठी सहभागी होत असतील तर, त्यांना जात आणि धर्माच्या नावावर मज्जाव करणं किंवा बंधने लादणं ही बाब पूर्णतः विरोध करण्यासारखी आहे. म्हणून या उत्सवामध्ये खास करून भारतातल्या बहुजन समाजाचा हा उत्सव आहे, त्यावर कोणत्याही धर्माला आपला दावा करता येणार नाही.  भारतातील बहुजन समाज समतेच्या शोधात वेगवेगळ्या धर्मात विभागला गेला असला तरी, तो मूळतः बहुजन आहे.  म्हणून बहुजनांच्या संस्कृतीत सहभागी होण्याचा आजच्या तरुण-तरुणींना तितकाच अधिकार आहे, ही गोष्ट आता स्पष्टपणे बजावणे गरजेचे आहे.

COMMENTS