अहिल्यानगर/नाशिक : नाशिक शहराला समृद्धी महामार्गाशी जोडणारा स्वतंत्र कनेक्टर मार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र, शहराला समृद्धी महामार्गाशी जोडण

अहिल्यानगर/नाशिक : नाशिक शहराला समृद्धी महामार्गाशी जोडणारा स्वतंत्र कनेक्टर मार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र, शहराला समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या कनेक्टर रस्त्याच्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्प रखडला असून प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर आ. सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करून नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारने समृद्धी महामार्गाशी नाशिक शहराला जोडण्यासाठी स्वतंत्र कनेक्टर रस्त्यास मंजुरी दिली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) १६.५ किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. या रस्त्याचे भूसंपादन २०२४ च्या अखेरीस पूर्ण झाले असून, त्यानंतर सुरू करण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले नाही.
“समृद्धी महामार्गामुळे नाशिकच्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते. ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल आणि अॅग्रो-प्रोसेसिंग उद्योगांसाठी ही जोडणी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. मात्र, रस्त्याच्या कामात झालेल्या विलंबामुळे नाशिकला अपेक्षित प्रगती मिळत नसल्याचे आ. तांबे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
“कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही जोडणी तातडीने पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. प्रकल्प रखडल्यामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देऊन नव्याने निविदा प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी,” अशी ठाम मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
आ. सत्यजीत तांबे यांनी यापूर्वी ही अधिवेशनात (दि. 19 मार्च 2025) हा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला होता. मात्र, त्या चर्चेनंतरही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसल्याने त्यांनी आता उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तातडीने या प्रकल्पावर बैठक घेण्याची आणि काम सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना देण्याची मागणी केली आहे.
COMMENTS