नगर मनपाचे नगरसेवक फक्त सांगकामे झालेत…भाजप नगरसेवक कोतकरांचा उद्विग्न दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर मनपाचे नगरसेवक फक्त सांगकामे झालेत…भाजप नगरसेवक कोतकरांचा उद्विग्न दावा

अहमदनगर/प्रतिनिधी : नागरिक आमच्याकडे विविध सुविधांची मागणी करतात व मनपा सेवेच्या तक्रारी करतात, त्या आम्ही मनपाचे अधिकारी व संबंधित विभाग प्रमुखांना

अजित पवारांनी रोहित पवारांना झापलं LokNews24
कमी पटसंख्यांच्या शाळाबंदीमुळे गरीब मुले वंचित राहण्याची भीती
स्वामीराज कुलथे यांना राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार घोषित

अहमदनगर/प्रतिनिधी : नागरिक आमच्याकडे विविध सुविधांची मागणी करतात व मनपा सेवेच्या तक्रारी करतात, त्या आम्ही मनपाचे अधिकारी व संबंधित विभाग प्रमुखांना सांगतो. हो साहेब… होईल ते काम, असे अधिकारी सांगतात. तसे उत्तर आम्ही नागरिकांना देतो. पुढे ते कामही होत नाही व काहीच होत नाही. नागरिक फक्त आम्हा नगरसेवकांना शिव्याच देतात व आम्ही नगरसेवक फक्त सांगकामेच झालो आहोत, असा उद्विग्न दावा मनपातील भाजपचे केडगावमधील नगरसेवक मनोज कोतकर यांनी केला आणि सारेच अवाक झाले.
मनपाच्या अग्निशामक दलाने नव्या गाडीची चेसी खरेदी केली असून, त्यावर अग्निशामक वाहन साचा बसवण्याच्या कामासाठी 50 लाख खर्चाला मनपा स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. पण यानिमित्ताने मनपाच्या अग्निशामक दलाच्या कामावर तसेच मनपा प्रशासनाच्या एकूणच कामावर जोरदार चर्चा झडली व यात नगरसेवक कोतकर यांनी उद्वेग व्यक्त केला. मनपा अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्यावर त्यांच्या टीकेचा रोख होता. नगरसेवक कोतकर म्हणाले, मनपाचे सर्व प्रकारचे भंगार विकून त्या पैशांतून अग्निशामक दलाला नवी गाडी घेण्याचे सुचवले होते, सध्या असलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्या आम्ही कॉलेजला असल्यापासून पाहात आहोत, नव्या गाड्या घेण्यासाठी प्रस्ताव तयार करा व शहराच्या आमदार-खासदारांद्वारे शासनाला पाठवून त्यांच्याद्वारे शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे सांगितले आहे पण त्याचेही काहीही झालेले नाही, अग्निशामक दलासाठी मानधनावर कर्मचारी घेण्याचेही सुचवले पण त्याबाबतही प्रशासन काही करीत नाही. हे गाव (अहमदनगर) आमच्या बापाचे थोडीच आहे, नगरच्या जनतेच्या सुविधांसाठीच आम्ही सांगतो ना? आमची पोरे मोठी झाल्यावर त्यांना तुम्ही नव्या घेतलेल्या गाड्या दाखवणार आहात काय?, अशा शब्दात मनपा प्रशासनाला धारेवर धरीत कोतकर म्हणाले, आम्ही नगरसेवक आहोत व तुम्ही नोकरदार आहात, कायमस्वरुपी कोणीही नाही. तेव्हा चांगले काम केले पाहिजे. नागरिक आम्हाला तक्रारी सांगतात, आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही आश्‍वासने देता व पुढे काहीच होत नाही. आम्ही फक्त सांगकामे व शिव्यांचे मालक झालो आहोत. पण तुम्हाला (अधिकारी) शहर चालवायला दिले आहे व हे वरचा बघतोय, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

अन्य नगरसेवकही आक्रमक
कोतकर यांनी मनपा प्रशासनावर भडीमार सुरू केल्यावर प्रकाश भागानगरे व श्याम नळकांडे तसेच सचिन शिंदे व डॉ. सागर बोरुडे यांनीही या विषयाच्या अनुषंगाने अग्निशामक दलासह एकूणच मनपा प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अग्निशामक दलाला आऊटसोसिर्ंगने कर्मचारी मिळत नसतील तर मानधनावर घेतले जावेत, सध्या दोनच गाड्या असून, त्या 10 वर्षांपूर्वीच्या आहेत, त्यामुळे नव्या गाड्या घ्यायला हव्यात, मनपा फंडातून कामे होत नसल्याने नव्या निधीची तरतूद केली पाहिजे, अग्निशामक विभागात सर्वच कर्मचारी प्रशिक्षित हवेत, कोठे आग लागली तर मनपाच्या गाड्यांऐवजी बाहेरून गाड्या मागवण्याची वेळ येते, तुम्हाला अधिकारी म्हणून काम जमत नसेल तर सोडून द्या अन्य कोणीही तुमचे काम पाहील, शासनाकडून वाहन खरेदीला अनुदान नसले तरी साहित्य खरेदीला असल्याने ते तरी मिळवा व नव्या वाहनांसाठी आमदार-खासदारांद्वारे शासनाकडे पाठपुरावा करा, असा भडीमार सर्वांनीच केल्याने मनपा प्रशासन निरुत्तर झाले व आवश्यक कार्यवाहीची ग्वाही फक्त दिली गेली.

सभापती घेणार पुढाकार
मनपा अग्निशामक दलाच्या दुरवस्थेबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्याने अखेर सभापती अविनाश घुले यांनी हस्तक्षेप केला व अग्निशामक दलाच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे जाहीर केले तसेच नगर शहरातील सहा झोनला सहा नव्या अग्निशामक गाड्या घेण्याचा प्रस्ताव तातडीने करण्याचे आदेश त्यांनी मिसाळ यांना दिले. दोन दिवसांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरला येणार असल्याने त्यांच्याकडून या प्रस्तावाच्या आधारे जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून या गाड्या मिळण्याची मागणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

COMMENTS