नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण आणि इस्त्रायल यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही देशांतील हवाई वाहतूक काही काळ विस्कळीत झाली

नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण आणि इस्त्रायल यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही देशांतील हवाई वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र हवाई क्षेत्र टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 52 हजारांहून अधिक भारतीय नागरिक स्वदेशात परतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, पश्चिम आशियातील घडामोडींवर भारत सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्या भागात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गरज पडल्यास संबंधित देशांच्या प्रशासनाशीही सातत्याने संपर्क ठेवून मदत पुरविली जात आहे. त्या प्रदेशातील भारतीय दूतावासांकडून तेथील नागरिकांसाठी वेळोवेळी सूचना जारी केल्या जात आहेत. तसेच अडचणीत असलेल्या भारतीयांना तात्काळ मदत मिळावी यासाठी चोवीस तास कार्यरत असलेली मदत सेवा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन दिले जात आहे. संघर्षानंतर काही दिवसांतच भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पुन्हा व्यावसायिक उड्डाणे सुरू केली. या उड्डाणांचा लाभ घेत हजारो भारतीयांनी स्वदेश गाठले. एक ते सात मार्च या कालावधीत भारतीय विमान कंपन्यांमार्फत 32 हजार 107 प्रवाशांनी भारतात प्रवास केल्याची नोंद आहे. पुढील काही दिवसांत आणखी उड्डाणांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात सरासरी दररोज सात हजारांहून अधिक भारतीय स्वदेशी परतत असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे. संकटग्रस्त भागातील भारतीय दूतावासांनी चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू केले असून तेथून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. सरकारने त्या भागात राहणार्या किंवा तेथे जाण्याचा विचार करणार्या भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः संघर्षग्रस्त प्रदेशात अनावश्यक प्रवास टाळावा तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासांकडून देण्यात येणार्या मार्गदर्शक सूचनांकडेही नागरिकांनी लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS