पुणे ः पुण्यातील हडपसर भागात लूटमार, दरोडा घालणार्या शेलार टोळीच्या चोरट्यांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी
पुणे ः पुण्यातील हडपसर भागात लूटमार, दरोडा घालणार्या शेलार टोळीच्या चोरट्यांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कांतर्गत केलेली सदरची 38 वी कारवाई आहे. अमोल भास्कर शेलार (वय 25, रा. नेवासा फाटा, जि. अहमदनगर), स्वप्नील उर्फ भावड्या इश्वर केंदळे (वय 29, रा. संभाजीनगर, नेवासा, जि. अहमदनगर), अमर चिल्लू कांबळे (वय 35, रा. नेवासा, जि. अहमदनगर), तसेच एका सराफ व्यावसायिक विजय रामकृष्ण देडगावकर (वय 63), कोल्हार, ता. राहाता, जि. अहमदनगर) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. हडपसर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आरोपी शेलार, केंदळे, कांबळे यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली होती. शेलार आणि साथीदारांनी पुणे, तसेच अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे केले आहेत. पोलिसांनी तपास करुन शेलार, केंदळे, कांबळे यांना पकडले. चौकशीत त्यांनी चोरलेल्या दागिन्यांची विक्री सराफ व्यावसायिक देडगावकर यांना केल्याची माहिती मिळाली आहे. या टोळीने जबरी चोरी, लूटमार, दरोडा असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. चोरट्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वास डगळे, शिवले, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, दीपक बर्गे यांनी तयार केला. पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी प्रस्तावाची पडताळणी केली. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने शेलार आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख-केदार तपास करत आहेत.
COMMENTS