छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असलेले मोडी अप्रकाशित पत्र उजेडात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असलेले मोडी अप्रकाशित पत्र उजेडात

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद तसेच राज्याभिषेक व मृत्यू नोंद असलेले ऐतिहासिक अप्रकाशित मोडीपत्र उजेडात आले आहे. नगरच्या ऐतिह

ब्राम्हणगावात जागर लोकशाहीचा महोत्सव उत्साहात
मनोज पाटील साहेब, बाळ बोठेच्या “त्या” पंटर पत्रकाराची चौकशी कधी करणार ?l LokNews24
पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजार द्या ; अतिवृष्टी-गारपीट नुकसानीच्या भरपाईची मागणी,

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद तसेच राज्याभिषेक व मृत्यू नोंद असलेले ऐतिहासिक अप्रकाशित मोडीपत्र उजेडात आले आहे. नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक व मोडीअभ्यासक डॉ. संतोष यादव यांनी ते उजेडात आणले आहे. पुण्याच्या सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्याकडील मोडी कागदपत्रांचा संग्रह नुकताच ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाकडे अनुपमा मुजुमदार यांनी सुपूर्द केला आहे. या मोडी संग्रहात छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद तसेच राज्याभिषेक व मृत्यू नोंद असलेले ऐतिहासिक अप्रकाशित मोडीपत्र आहे.
अनुपमा मुजुमदार यांनी वस्तु संग्रहालयास हजारो मोडी कागदपत्रे दिली आहेत. वस्तू संग्रहालयाने तातडीने या दस्तऐवजाचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. नारायण आव्हाड, आनंद कल्याण, राहुल भोर तसेच रामदास ससे, बापू मोढवे, गणेश रणसिंग आदी इतिहास अभ्यासक या दस्तऐवजाचे वर्गीकरण करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असल्याचे मोडीपत्र सापडले. त्याचा अभिरक्षक डॉ. संतोष यादव यांनी सखोल अभ्यास करून त्याचे लिप्यंतर केले. या पत्रामध्ये छत्रपती शाहू राज्यारूढ झाले, वैकुंठ गमन या नोंदी तसेच बाळाजी बाजीराव पेशवाई कधी करू लागले, वैकुंठगमन कधी झाले, नारायणराव पेशवे यांनी नऊ महिने राज्य केले, आबाजी त्र्यंबक यास दिवाणगीचे वस्त्र दिले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शके 1549 (इ.स.1627), पट्टाभिषेक(राज्याभिषेक) शके 1596(इ.स.1674), मृत्यू (वैकुंठ गमन) शके 1602 (इ.स.1680) अशा मोडीतील नोंदी आढळून आल्या आहेत. तसेच या पत्रात बाळाजी विश्‍वनाथ, माधवराव बल्लाळ, सवाई माधवराव यांच्या राज्यरोहणाच्या व वैकुंठ गमनाच्या नोंदी उल्लेखीत आहेत, अशी माहिती डॉ. यादव यांनी दिली. डॉ. यादव यांच्या मते, हे मोडी पत्र इसवी सन 1800 ते 1850च्या दरम्यान लिहिलेले असावे. यातील सर्व नोंदी तपासल्या असता, सर्व नोंदी बरोबर आहेत. छत्रपती यांची जन्म नोंद इ.स. 1627 अशी या पत्रात उल्लेखित केलेली आहे. या पत्रावर कुठेही शिक्का आढळून आलेला नाही. ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. रवींद्र साताळकर या पत्राविषयी म्हणाले, हे पत्र मराठी व इंग्लिश लिप्यंतर करून संग्रहालयाच्या शोकेसमध्ये अभ्यासकांना पाहण्यासाठी व अधिक संशोधनासाठी ठेवले जाईल. तसेच नगरचे जिल्हाधिकारी व वस्तू संग्रहालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले या पत्राबाबत म्हणाले, या ऐतिहासिक व अप्रकाशित पत्रामुळे संग्रहालयाच्या नावलौकिकात आणखी भर पडेल. संग्रहालयात छत्रपतींची 20 फूट लांबीची वंशावळ, छत्रपती संभाजी महाराजांचे दुर्मिळ छायाचित्र आहेच. त्यात या पत्राची भर पडल्याने संग्रहालयाचा लौकिक वाढला आहे, असे गौरवोदगार त्यांनी व्यक्त केेले. दरम्यान, या मोडी पत्रसंग्रहातून आणखी अनेक ऐतिहासिक नोंदी समोर येतील, असे डॉ. यादव यांनी सांगितले.

कोण होते सरदार मुजुमदार…
श्रीमंत सरदार आबासाहेब मुजुमदार हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते. खास सरदारकीचा मान त्यांना मिळाला होता. संस्थानिकांच्यावतीने प्रतिनिधी म्हणून इ.स. 1929,1930,1931 या तीनही गोलमेज परिषदांना ते उपस्थित होते. नगर तालुक्यातील वाळकी हे गाव त्यांना जहागिरी म्हणून मिळाले होते. अनेक शास्त्रांचा आणि कलांचा त्यांना छंद होता. संगीत, इतिहास, अध्यात्म, चित्रकला, फोटोग्राफी, भाषा अभ्यास, देशी-परदेशी खेळ, गायन कलेचे ते उस्ताद होते. या विविध छंदातून त्यांनी 35 हजार चित्रांचा व जुन्या दुर्मिळ वाद्यांचा संग्रह केला आहे. संगीताबरोबरच त्यांचे इतिहासावर प्रेम होते. मराठा इतिहासावर त्यांचा सखोल अभ्यास होता. आबासाहेबांना तेरा भाषांची जाण होती. या सर्व भाषांतील संदर्भग्रंथ व मोडी पत्रे, फार्सीचे दप्तर, अनेक दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह, गणेशमूर्ती असा दुर्मिळ अमूल्य ठेवा व दोन लाख रुपयांचा धनादेश आबासाहेबांची नातसून अनुपमा मुजुमदार यांनी ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास सुपूर्द केलेला आहे. याद्वारे दरवर्षी अभ्यासकांना आबासाहेब मुजुमदार इतिहास संशोधक पुरस्कार दिला जातो. यावेळचा पुरस्कार इतिहास अभ्यासक मोडी जाणकार राज मेमाणे यांना दिला गेला आहे. त्यातीलच काही ऐतिहासिक दस्तऐवजातील नोंदी समोर आल्या आहेत व भविष्यातही येणार आहेत, असे डॉ. यादव यांनी सांगितले.

COMMENTS