म्हसवड / वार्ताहर : शहराच्या सुव्यवस्थेसाठी आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी म्हसवड नगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन

म्हसवड / वार्ताहर : शहराच्या सुव्यवस्थेसाठी आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी म्हसवड नगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद हद्दीतील अवैध बांधकामांवर जेसीबी चालवत अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या कारवाईकडे लागले होते.
शहरातील एका भागात परवानगीशिवाय बांधकाम करून त्याचे धर्मस्थळात रूपांतर करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या होत्या. यासंदर्भात मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी स्वतः पाहणी करून संबंधित बांधकाम मालकाला नोटीस बजावली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने हे अवैध बांधकाम जमीनदोस्त केले.
पालिकेने कारवाई केल्यानंतर पंढरपूर नाका ते सिध्दनाथ मंदिर दरम्यान मोठा रूट मार्च काढत अतिक्रमणधारकांना इशारा दिला. शहरात कुठलेही अवैध बांधकाम सहन केले जाणार नाही. जे अतिक्रमण केले आहे त्यांनी स्वतःहून ते काढून टाकावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ठाम संदेश मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी दिला.
लोहार कुटुंबियांचे घरही जमीनदोस्त
शहरातील सिध्दनाथ विद्यालयाजवळ सुरू असलेल्या विकासकामांस अडथळा ठरणारे लोहार कुटुंबियांचे घरही पाडण्यात आले. पालिकेने त्यांना आधीच नोटीस दिली होती. मात्र, घर स्वमालकीचे असल्याचा दावा करत त्यांनी आठ दिवसांपासून पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात त्यांच्या घरावरही कारवाई केली.
COMMENTS