मुंबई ः आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून, सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच एका वृत्तव
मुंबई ः आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून, सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा दावा केला आहे, तर महायुतीला मोठा फटका मिळणार असल्याचा दावा केल्यामुळे महायुतीच्या गटामध्ये खळबळ उडाली आहे. या सर्व्हेत आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांतील निकाल धक्कादायक ठरण्याचा दावाही करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा असून, या ओपिनियन पोलमध्ये इंडिया आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली असती तर महायुतीला 19 ते 21 जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर अन्य पक्षांच्या खात्यात 0-2 जागा जाण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण मतांपैकी 37 टक्के मते महायुतीला तर 41 टक्के मते महाआघाडीच्या वाट्याला जाऊ शकतात. अन्य पक्षांना 22 टक्के मते मिळू शकतात. या सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल. विरोधकांच्या या आघाडीला सत्ताधारी महायुतीपेक्षा 4 टक्के जादा मते मिळतील. या सर्व्हेमुळे सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गटात एकच खळबळ माजली आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत 3 राज्यांत भाजपने जबरदस्त यश मिळवले. या विजयामुळे भाजप नेत्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. विशेषतः या यशानंतर लोकसभा निवडणुकीतही भाजपला यश मिळून नरेंद्र मोदी सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, राज्यातील राजकीय उलथपालथ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेची युती मोडली. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कट्टर विरोधी पक्ष असणार्या शिवसेना व दोन्ही काँग्रेसचे सरकार सत्तेत आले. पण अवघ्या अडीच वर्षांतच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत फूट पडली. त्यानतंर एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी भाजपसोबत घरोबा करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी सत्ताधारी भाजप व शिंदे गटासोबत जाणे पसंत केले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर या सर्व्हेला महत्व प्राप्त होतांना दिसून येत आहे.
मविआला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज – लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर सत्ताधारी महायुतीला अवघ्या 19 ते 21 जागांवर समाधान मानावे लागेल. इतर पक्षांच्या वाट्याला 0 ते 2 जागा जातील. मतांच्या टक्केवारीतही या निवडणुकीत महाविकास आघाडी वरचढ ठरण्याचा दावा या सर्व्हेत करण्यात आला आहे. त्यानुसार, मविआला 41, तर महायुतीला 37 टक्के मतदान पडेल. तर 22 टक्के मते इतर पक्षांत विभागली जातील.
COMMENTS