नवी दिल्ली दि.22: प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलतेमुळे संसार सुरळीत होतोय असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातत आयोजित 'मनमोकळा संवाद - मरा

नवी दिल्ली दि.22: प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलतेमुळे संसार सुरळीत होतोय असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातत आयोजित ‘मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादातून निघाला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी “मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी संसार” या विषयावरील परिसंवादात माजी सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि डॉ. साधना शंकर, रेखा रायकर आणि मनोज कुमार , ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष, गायिका उद्योजक डॉ. मंजिरी वैद्य आणि प्रसन्न अय्यर या मान्यवरांनी सहभाग घेतला. विशेष पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते. या परिसंवादाचे संयोजन अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी केले होते.
परिसंवादादरम्यान मराठी-अमराठी संसारातील संवाद, संस्कृतीतील भिन्नता, कौटुंबिक नातेसंबंधांवरील परिणाम आणि मुलांच्या भाषिक जडणघडणीसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली. भाषेमुळे एकमेकांशी संवाद होत असतो त्यामुळे अधिक व्याकरणात न पडता अधिकाधिक लोकांनी संवाद आपल्या आपल्या मातृभाषेत साधला पाहिजे असे एक मत या परिसंवादात व्यक्त झाले.
परिसंवादात सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांनी वैवाहिक जीवनातील भाषिक गमतीजमती उलगडल्या, तर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी विविध भाषांमधील संवादाने समजुतीला कसा हातभार लावला याची माहिती दिली. मनोज कुमार यांनी आपणास मराठी पूर्णपणे समजत असून मराठी सिनेमा आणि नाटकाचे चाहते असल्याचे त्यांनी सांगितले. सागरिका घोष मराठीतले काही शब्द हिंदीत वेगळा अर्थ निघतो मूळ अर्थ कळल्यावर आलेले हसू रोखता आले नाही असा अनुभव सांगितला. डॉ. साधना शंकर सासुबाईंसोबत भाषेतून आणि भावनेतून झालेला संवाद एकमेकांसाठी पुरेसा होता. मराठी येत नसल्यामुळे सासुबाई मनसोक्त व्यक्त व्हायच्या, ही आठवण त्यांनी ताजी केली. डॉ. मंजिरी वैद्य तमिळ कुटुंबात गेल्यावर पाल या शब्दाला दूध असे म्हटल्याने निर्माण झालेल्या गमतीचा अनुभव त्यांनी सर्वांसमोर मांडला. सासरचे कुटुंब मोठे सर्वांनी सांभाळून घेतल्याचे रेखा रायकर यांनी सांगितले. परिसंवादाच्या शेवटी भाषिक विविधता हा अडथळा न ठरता समृद्धीचे साधन ठरू शकतो, असा सकारात्मक सूर उमटला.
COMMENTS