नवी दिल्ली : मराठी केवळ भाषा नाही तर, ती एक संस्कृती आहे. या भाषेने वंचित लोकांना पुढे आणण्यासाठी देखील मोठे कार्य केले आहे. ज्योतिबा फुले, बाबा

नवी दिल्ली : मराठी केवळ भाषा नाही तर, ती एक संस्कृती आहे. या भाषेने वंचित लोकांना पुढे आणण्यासाठी देखील मोठे कार्य केले आहे. ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे महान कार्य केले आहे. मराठीने आपल्याला अनेक दलित साहित्यिक पण दिले. मराठीमध्ये शूरता आहे, वीरता आहे, सौन्दर्य आहे संवेदना आहे, समानता आहे समरसता पण आहे, अध्यात्माचे स्वर पण आहे आणि आधुनिकतेची लहर पण आहे, मराठी भाषेत शक्ती पण आहे युक्ती पण आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, गोरा कुंभार, बहिणाबाई अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून समाजाला नवी दिशा दिली आहे. मराठी भाषा अमृतापेक्षा जास्त गोड असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत केले. 98 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष खा.शरद पवार उपस्थित होते.
पुढे बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने देखील मोठा बदल घडवला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवा सारख्या वीर मराठ्यांनी शत्रूंना मजबूर केले. स्वातंत्र्याच्या लढाईत वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या सैनिकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. केसरी आणि मराठा सारखे वृत्तपत्र, राम गणेश गडकरी यांचे नाटक, यातून स्वातंत्र्याचे काम केले. देशातील तसेच जगातील सर्व मराठी प्रेमिकांना या कार्यक्रमाचे शुभेच्छा देतो आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला, असे मोदी मराठीमध्ये म्हणाले. यावेळी मोदींनी संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेवरील ओळी देखील म्हणून दाखवल्या. मराठी भाषा अमृतापेक्षा जास्त गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेवर माझे जे प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी नेहमी मराठीमधील नवीन नवीन शब्दांना शिकण्याचा प्रयत्न करत असतो असेही पंतप्रधान पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.
दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 98 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी मराठीजन, लोकनृत्यांचे सादरीकरण व ‘अभिजात मराठी’च्या जयघोषाने राजधानीतील तालकटोरा स्टेडियमचा अवघा परिसर मराठीमय झाला होता. जुन्या संसद परिसरातील रकाबगंज गुरूद्वाराजवळ ग्रंथपूजन, ध्वजारोहण होऊन ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अ. भा. म. सा. महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, खासदार सुप्रिया सुळे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक, दिल्लीतील आणि महाराष्ट्रातून आलेले हजारो मराठी बांधव मोठ्या उत्साहाने मराठमोळ्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले. यावेळी पंढरपूर येथून साहित्य संमेलनासाठी आलेली विशेष दिंडीही सोबत होती. ढोलताशाच्या गजरासह दिंडीत लावणी, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, पोवाडा, वासुदेव, आदिवासी नृत्य आदी लोककला, लोकनृत्यांचे सादरीकरण झाले. यावेळी महिलांनी उत्स्फुर्तपणे फुगडी खेळली.
COMMENTS