Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंनी सोडले आमरण उपोषण

मुंबई ः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला लढा तीव्र करण्यात आला होता. मराठा आंदोलकांनी मुंबईकडे कूच करत आझाद मैदानात

शिर्डीत लाखो भाविकांची मांदियाली
जुन्या रागातून भैरोबा मंदिरासमोर मनसेच्या कार्यकर्त्याचा खून
तर नवाब मलिकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही – आशिष शेलार

मुंबई ः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला लढा तीव्र करण्यात आला होता. मराठा आंदोलकांनी मुंबईकडे कूच करत आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केली होती. मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करून राजपत्र जारी करण्यात आले. मात्र मनोज जरांगे यांनी काही सुधारणा सुचविल्यानंतर या सुधारणा करून सुधारित राजपत्र जारी केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेत, आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सुधारित राजपत्र मनोज जरांगे यांना सुपूर्द केले असून त्यांचे उपोषणही सोडवले आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह सर्व आंदोलनकर्ते आणि मराठा समाजाने एकच जल्लोष केला, गुलाल-भंडार्‍याची उधळण केली. विजयी गुलाल उधळल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सर्व आंदोलकांना आणि मराठा समाजाला संबोधित केले. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील गावखेड्यांमध्ये मराठा आणि ओबीसी समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांची मदत करतात, प्रेम करतात. परंतु, काही नेते येतात आणि समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. माझे त्यांना एकच सांगणे आहे की, त्यांनी समाजांमध्ये भांडण लावू नये. आम्ही त्या नेत्यांचाही आदर करतो, परंतु, आमच्या त्यांच्या या विचारांना विरोध आहे. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. त्याचप्रमाणे त्यांनीही आम्हाला विरोध करू नये.

आरक्षणाला धोका झाल्यास खबरदार – मनोज जरांगे यावेळी म्हणाले, आपण आत्ता इथून आरक्षण घेऊ जात असलो तरी, यापुढे आरक्षणात अडचणी आल्या, तर त्या सोडवण्यासाठी मी सर्वात पुढे उभा असेन, असा शब्द संपूर्ण समाजाला देत आहे. या अध्यादेशाला काही धोका झाला तर सर्वात अगोदर उपोषणासाठी मी मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल होईन. मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आपला गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. 54 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांनाही तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अशी मागणीही मनोज जरांगे यांनी यावेळी केली.

अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी सरकारची – अध्यादेश टिकवण्याची आणि लावून धरण्याची जबाबदारी आता राज्य सरकारची आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केले की, समाजाचा हा आनंद टिकला पाहिजे. जरांगे म्हणाले, राज्य सरकारने आम्हाला न्याय दिला आहे. आम्ही गुलाल उधळतोय. परंतु, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या. हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. आम्ही इथून आरक्षण घेऊन जातोय. हा विजय महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांचा आहे. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या लोकांचे स्वप्न आज साकर होत आहे.

मतासाठी नव्हे, हितासाठी निर्णय ः मुख्यमंत्री शिंदे – आपण मतासाठी नसून हितासाठी निर्णय घेतो, आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आत्तापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहेत. या समाजाने अनेक लोकांना नेता केले. या समाजामुळे अनेक लोकांना मोठी पदे मिळाली, असल्याचे यावेळी मराठा आंदोलकांना संबोधित करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  कुणबी नोंदी मराठवाड्यात कधी आढळत नव्हत्या. पण लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या हेत. सरकारची मानसिकता देण्याची आहे. आपलं सरकार घेणारं नाही देणारं असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

मनोज जरांगेंच्या सात मागण्या मान्य – यावेळी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेशातील महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखवले. कुणबी समाजाला प्रमाणपत्र देणे, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देणे, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीर लावणे, सगेसोयर्‍यांच्या बाबतीत अधिसूचना, वंशावळीसाठी समिती नेमणे या गोष्टींबाबत आपण निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

COMMENTS