अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरीत एटीएममध्ये हातचलाखी करून दोघांनी तब्बल अडीच लाखाची रोकड लांबविली. राहुरी शहरातील एका एटीएममध्ये दोन अज्ञात भामटयांनी हातच
अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरीत एटीएममध्ये हातचलाखी करून दोघांनी तब्बल अडीच लाखाची रोकड लांबविली. राहुरी शहरातील एका एटीएममध्ये दोन अज्ञात भामटयांनी हातचलाखी करून एटीएम कार्डची अदलाबदल केली. नंतर त्या एटीएम कार्डवरून वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे अडीच लाख रुपये काढून घेण्यात आले. ही घटना दि. 28 एप्रिल ते 2 मे दरम्यान घडली आहे. परसराम तुळशीराम साखरे (वय 45, रा.गोटुंबे आखाडा, ता.राहुरी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 28 एप्रिल रोजी दुपारी सव्वाबारा वाजेदरम्यान परसराम साखरे हे राहुरी शहरातील बसस्थानक समोरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांना दोन भामटे भेटले. त्यांनी गोड बोलून परसराम यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर हातचलाखी करून एटीएम कार्डची अदलाबदल केली. साखरे यांचे एटीएम कार्ड घेऊन त्यांना सचिन हरिभाऊ डहाळे नावाचे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर त्या दोन भामटयांनी दि.28 एप्रिल ते 2 मे दरम्यान साखरे यांच्या एटीएम कार्डवरून वेगवेगळ्या ठिकाणांहून 2 लाख 54 हजार 498 रुपये काढून घेतले आणि साखरे यांची फसवणूक केली. हा प्रकार साखरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. साखरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील करीत आहे.
COMMENTS