Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात 8 पैकी 8 जागांवर महायुती विजयी: महाविकास आघाडीचा धक्कादायक पध्दतीने सुफडा साफ

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेक

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 5 कोटींचा निधी मंजूर
चांदोली धरणातून 7680 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग: वारणा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई सुरू

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळचा गड ढासळला असून महायुतीचाच बालेकिल्ला तयार झाला आहे. भाजपचे चार, शिंदेसेनेच्या दोन आणि अजित पवार गटाने दोन जागांवर विजय मिळवला. तसेच धक्कादायक बाब म्हणजे कराड दक्षिण मतदार संघात स्वातंत्र्यांनतर पहिल्यांदा परिवर्तन झाले असून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी विजयापर्यंत पोहोचू दिले नाही.
सातारा विधानसभेच्या आठ जागांपैकी सातार्‍याच्या जागेवर विद्यमान आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजय मिळविला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांना किती लीड मिळणार हीच चर्चा सुरु होती. शिवसेनेच्या उबाठा गटाचे अमित कदम यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे निवडणूक सोपी झाली. विद्यमान आमदार भोसले त्यांनी 1 लाख 75 हजार 62 मते मिळवत उध्दवसेनेच्या अमित कदम यांचा 1 लाख 40 हजार मतांनी पराभव केला.
वाई विधानसभा मतदार संघातही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटील यांच्या विरोधात दिवंगत मंत्री मदन पिसाळ यांच्या सुनबाई सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अरूणादेवी पिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अर्ज भरला होता. 50 हजारांहून अधिकचे मताधिक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव केला.
कोरेगाव विधानसभा मतदार संघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा शिंदेसेनेच्या व विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्याशी अटी-तटीच्या सामना झाला. मात्र, या लढतीत आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेप्रमाणेच पराभव सामोरे जावे लागले.
फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना शह देत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले उमेदवार सचिन पाटील यांना निवडून आणले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून उमेदवारी अर्ज भरलेले आमदार दीपक चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याबरोबरच रामराजेंचा मतदार संघावरील प्रभाव कमी करण्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना काही प्रमाणात यश आले.
पाटणमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान मंत्री शंभुराज देसाई आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजिव सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता. तसेच उबाठा गटाने हर्षद कदम यांना उमेदवारी दिली होती. मात्र, देसाई विरुध्द पाटणकर यांच्यात चांगली लढत झाली. या मतदार संघात उबाठाचे हर्षद कदम किती मते खाणार यावर निकाल अवलंबून होता. मात्र, कदम यांना पाटणच्या पारंपारीक लढतीत प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे शंभुराज देसाई यांचा विजय झाला.
कराड उत्तर मतदार संघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपच्या मनोज घोरपडे यांना सातारचे आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा तालुक्यातील मताधिक्क्याचा निवडणूकीत विजयश्री खेचून आणण्यास चांगला फायदा झाला. त्यांना शेवटच्या टप्प्यात शह देण्याचा प्रयत्न झाला मात्र पहिल्यापासून मतदार संघात सुरू केलेला झंझावात रोखण्यात विरोधकांना यश आले नाही.
माण मतदार संघातून भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी पहिल्यापासून आघाडी घेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा पराभव केला. मागील विधानसभा निवडणूकीत आमचं ठरलंय या टिममधील भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर हे वगळता सर्वजण घार्गे यांच्या बाजूने होते. मात्र, त्यांना त्यांच्या गटातील एकी ठेवता आली नाही. तसेच मागील विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून उमेदवार असलेले आ. जयकुमार गोरे यांचे बंधू अचानक शिवसेनेच्या उबाठा गटाला जय महाराष्ट्र म्हणून यंदा उघडपणे मदतीला धावून गेले. त्यामुळे आ. गोरे यांना आपला विजयाचा मार्ग सोपा झाला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला. या ठिकाणी भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी विजय मिळविला आहे. पहिल्या फेरीपासून डॉ. अतुल भोसले आघाडीवर होते. मतमोजणीच्या फेर्‍या वाढल्या तसे त्यांचे मताधिक्यही वाढत गेले. सुमारे 40 हजारांहून अधिक मतांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून स्वातंत्र्यापासून ओळख होती. दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचा मागील विधानसभा निवडणूकीत परभव झाला होता. तसेच विजय उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना त्यावेळी तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती.

COMMENTS