मुंबई : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वय

मुंबई : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे उपस्थित होत्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणे याला शासनाचे प्राधान्य आहे. या भागीदारींमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या योजना लोक चळवळीच्या स्वरूपात पुढे येत आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने विविध विभागांच्या माध्यमातून सकारात्मक प्रभाव पाडण्यात यशस्वी होऊ. समाजातील सर्व घटकात उत्पन्न वाढून जगण्याचा स्तर उंचावण्यास यामुळे निश्चितच मदत होईल. दुर्धर आजारांवर महागड्या उपचार पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना मर्यादा येतात मात्र राज्यात यापुढे उपचाराविना कुणीही मृत्यू पावणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. टाटांची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मोठी मदत असून यामुळे आपण गरजू रुग्णांना निश्चित स्वरूपाची मदत देऊ शकतो.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील दहा वर्षांपासून टाटा ट्रस्ट सोबत शासन काम करीत आहे. केवळ निधी देऊन भागीदारी होत नाही, तर काम करून समाजात सकारात्मक प्रभाव पाडणारी भागीदारी टाटा करत असते. हे बहु-आयामी करार माता, नवजात बालक, बाल आणि किशोरवयीन घटकांसाठी आरोग्य सेवा बळकट करणे, खुंटलेली वाढ रोखून कुपोषणावर उपाय शोधण्यासाठी मदतगार ठरतील. या सोबतच पोषणासाठी आहारात वैविध्य आणणे, जलस्रोतांचे अधिक शाश्वतपणे जतन आणि व्यवस्थापन, ग्रामीण महाराष्ट्रात हवामान आधारित कृषी आणि पशुधन विकासाला चालना देण्याची क्षमता या भागीदारीत आहे. नाम फाउंडेशन राज्यात जलसंधारणामध्ये मोठे काम करीत आहे. मागील काळात जल स्त्रोतांमधील गाळ काढणे, नाला, नदी खोलीकरण व रुंदीकरण आदी कामे करण्यात आली आहेत. राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. ही योजना लोक चळवळीच्या स्वरूपात पुढे येत जनतेची योजना झाली. नाम फाउंडेशनच्या सहभागाने विदर्भ व मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागात जलसंधारणाचे मोठे काम झाले. यासाठी टाटा मोटर्सचीही मदत झाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र शासनाशी भागीदारी करून आरोग्य, शिक्षण, पोषण, उपजीविका, पाणी आणि स्वच्छता कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणणार आहे. सर्व सामन्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासनाचे विविध विभाग आणि समुदायांसोबत सकारात्मक परिणाम आणण्याचा हेतू असणार आहे. शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांनी आज राज्याच्या एकात्मिक विकासाला पाठबळ देण्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून धोरणात्मक भागीदारी अधिकृत केली आहे. नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर यांनीही शासनासोबत जलसंधारण क्षेत्रात काम करण्यास मदत मिळत आहे.
– नोएल टाटा, टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष

COMMENTS