Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यावधींची लूट

सा.बां. विभागातील अधिकार्‍यांनी मंत्र्यांना अंधारात ठेवून लाटला मलिदा

मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा अनेक वर्षांपासून ऐकविण्यात येत असल्या तरी, हा भ्रष्टाचार अजूनही कमी झालेला नाही

जनतेचे कामे करणे हेच माझे कर्तव्य-एल.आर.वाजे
‘व्यंकटेशा’! कुठं फेडशील हे पाप !
राज्यात 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण

मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा अनेक वर्षांपासून ऐकविण्यात येत असल्या तरी, हा भ्रष्टाचार अजूनही कमी झालेला नाही. दररोज भ्रष्टाचाराचे नवे उंच टोक गाठण्याचा सपाटा मुंबई शहर इलाखा विभागातील अधिकार्‍यांनी लावला असून, त्यांनी थेट मंत्र्यांना अंधारात ठेवून मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरूस्ती, डागडुजीवर कोट्यावधींचे बोगस बिले काढण्याचा सपाटा लावल्याची माहिती दैनिक लोकमंथनने यापूर्वीच प्रकाशित केली आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, मुंबई शहर इलाखा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्यांच्या कार्यकाळात मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरूस्ती आणि डागडुजीच्या नावाखाली काढण्यात आलेल्या बोगस बिलांची यादीच लोकमंथनकडे यापूर्वीच आलेली असून, हा खर्च डोळे दिपवून टाकणारा आहे. या मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये प्रत्यक्षात कामकाज न करता, मर्जीतील ठेकेदारांकडून बोगस देयके सादर करण्यास भाग पाडून, ती देयके कार्यकारी अभियंता यांनी मंजूर करून कोट्यावधींचा मलिदा लाटल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आपल्याच बंगल्याच्या दुरूस्तीसाठी कोट्यावधी रूपयांची उधळण होत असल्याची साधी गंधवार्ता देखील संबंधित मंत्र्यांना नसल्याचे दिसून येत आहे.

कार्यकारी अभियंता यांच्या कार्यकाळात काढण्यात आलेल्या बोगस देयकांची यादीच आमच्याजवळ आहे. यामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये कोणतेही कामकाज न करता, मार्च 2023 ते जुलै 2023 या कालावधीत 43 कोटींची बोगस देयके अदा केली असल्याचे संबंधित कागदपत्रांवरून दिसून येत आहे. यासोबतच कार्यकारी अभियंता दक्षिण उपविभागाचे अशोक गायकवाड, पश्‍चिम उपविभागाचे डावकर, शाखा अभियंता ओमप्रकाश पाटील, रसाळ या सर्व अधिकार्‍यांनी मिळून 150 कोटींपेक्षा अधिक रकमेचे देयके संबंधित मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी आणि दुरूस्ती केल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत, त्यामुळे 150 कोटींची उधळण कुणासाठी केली, आणि 150 कोटी कुणाच्या घशात गेले, याचा पर्दाफाश दैनिक लोकमंथन उद्याच्या अंकात करणार आहेत.

कोट्यावधींच्या बोगस देयके डोळे पांढरे करणारे – सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबई शहर इलाखा विभागात भ्रष्टाचाराने उंच टोक गाठला असून, या विभागातील अधिकार्‍यांनी मार्च-2023 ते जुलै 2023 या दरम्यान 43 कोटींची बोगस बिले, तर 150 कोटींपेक्षा जास्त रकमेचे देयके मंत्री महोदयांच्या बंगल्यांवर काम केल्याच्या बहाण्याने बोगस बिले काढण्यात आली आहेत. तर मार्च-2023 ते जुलै 2023 या दरम्यान प्रभारी उपअभियंता  रेश्मा चव्हाण यांनी विधान भवन इमारतीच्या डागडुजीसाठी 33 कोटी रूपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. बीडीडीच्या तोडकामासाठी 20 कोटींचा दुरूस्तीचा खर्च दाखवण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलाच्या वसाहतीवरही 300 कोटींचा नियमबाह्य खर्च दाखवण्यात आलेला आहे. यामध्ये वरळीचे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी 100 कोटी तर, अंधेरी उत्तर मुंबई विभागामध्ये यांनी 200 कोटींचे बोगस देयके तयार केल्याचे दिसून येत आहे.

लोकमंथनने ईडी, सीबीआयकडे यापूर्वीच केल्या आहेत तक्रारी – दैनिक लोकमंथनने 2023 मध्येच सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारावर आणि मंत्र्यांच्या बंगल्यावरील डागडुजीसंदर्भात केलेली कोट्यावधींच्या उधळणीवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय आणि आर्थिक गुन्हे शाखा आणि मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास हजारो कोटींचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.

अभियंता महेंद्र पाटील आणि पन्हाड यांच्या गैरव्यवहाराचा उद्यापासून पर्दाफाश – वरळी मुंबई मध्य विभागामध्ये कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी नंगानाच सुरू केला आहे. पाटील यांना साथ देणारा आणि स्वतःचे चॅनेल काढले आहे, असे प्रत्येक पत्रकाराला सांगणारा पन्हाड यांनी वरळीच्या पोलिस वसाहतीमध्ये केलेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश उद्यापासून वाचा दैनिक लोकमंथनमध्ये…

कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना बदनाम करण्याचा चांडाळ चौकडीचा डाव – सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दोन असे अधिकारी आहेत, ज्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिष्ठेची आणि पारदर्शक कारभार असायला हवा यासाठी तळमळ असलेले अधिकारी म्हणजे मुख्य अभियंता रणजीत हांडे आणि अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी होय. त्यांनी या विभागाला एका उंचीवर नेण्याचे काम करत असतांना, दुसरीकडे या दोन प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सार्वजनिक बांधकाम विभागातील चांडाळचौकडी करतांना दिसून येत आहे.

लोकमंथनच्या माहितीच्या आधारेच काहींची ‘जुनाट पत्रकारिता‘ – सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराविषयी दैनिक लोकमंथनने सातत्याने वाचा फोडली आहे. मात्र काही जुनाट पत्रकार त्याच शिळ्या कढीला ऊत आणून नव्या बाटलीत जुनी दारू भरण्याचा प्रकार करतांना दिसून येत आहे. लोकमंथनने यापूर्वी प्रकाशित केलेल्या बातम्या, आणि तपास यंत्रणांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगांने काही पत्रकार जुन्या बातम्यांना फोडणी देऊन आपल्या नावावर खपवण्याचा तकलादू प्रयत्न करतांना दिसून येत आहे. त्यामुळे आपण ‘नवा’ आणि ‘कुमार’ शोध लावल्याच्या भानगडीत या पत्रकारांनी पडू नये इतकाच इशारा.  

COMMENTS