सांगली जिल्हा न्यायालयीन सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहसंमेलनईश्वरपूर / प्रतिनिधी : जीवनामध्ये सर्वांशी मिळून-मिसळून वागल्यास आपल्याला अनेक मित्र

सांगली जिल्हा न्यायालयीन सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहसंमेलन
ईश्वरपूर / प्रतिनिधी : जीवनामध्ये सर्वांशी मिळून-मिसळून वागल्यास आपल्याला अनेक मित्र मिळतात. मित्रांच्या सहवासात सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदात जगता येते, असे मत उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पी. आर. बोरकर यांनी व्यक्त केले.
ते सांगली जिल्हा न्यायालय सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहसंमेलनात अध्यक्षस्थानी बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पंढरपूरचे एस. जी. नदीमठ, माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळूपकर, सेवानिवृत्त अधीक्षक चंद्रकांत मोडक, बाजीराव शिपुरे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एल. एन. बोर्डे, व्ही. के. मुर्गे, कामखेडकर, एस. डी. जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुलांच्या संसारामध्ये ढवळा-ढवळ करू नये. कारण जनरेशन गॅपमुळे वैयक्तिक मतभेद आपण टाळू शकतो, असा कानमंत्र न्यायमूर्ती एस. जी. नंदीमठ यांनी सेवानिवृत्त कर्मचार्यांना दिला.
प्रत्येक व्यक्तीचा पहिला मित्र हे त्याचे आजी-आजोबा असतात. त्यामुळे सेवानिवृत्तींनी आपले नातवंडाचे पहिले मित्र झाले पाहिजे, असा सल्ला सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळूपकर यांनी दिला.
दरम्यान, सेवानिवृत्त अधीक्षक जे. एस. साळुंखे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त न्यायमूर्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगली नाट्य स्वर पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त स्वीय सहाय्यक विकास जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ज्यांची वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व सदस्यांचा संमेलनात सन्मान करण्यात आला.
या संमेलनासाठी आबासाहेब शिंदे, सलीम मुल्ला, व्ही. ए. देसाई, सीताराम माळी, बेलीफ महिंद्रकर व ईश्वरपूरातील सेवानिवृत्त कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संमेलनाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त अधीक्षक जे. एस. साळुंखे, सूत्रसंचालन रुपेश पोळ यांनी केले. आभार सुनील जोशी यांनी मानले.

COMMENTS