Homeताज्या बातम्यासंपादकीय

समृध्दीवरची गावे समृद्ध होवोत ! 

देशाच्या लांब रूट असणाऱ्या महामार्गांपैकी एक समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. राज्य

भुजबळांच्या मनुवादाचा पर्दाफाश!
लोकप्रतिनिधींनी लोकांचं भान ठेवावं..!
देशाच्या इंधन साधनाची नवी गोळाबेरीज !

देशाच्या लांब रूट असणाऱ्या महामार्गांपैकी एक समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात समृद्धी मार्गाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अर्थात नागपूर ते मुंबई हे अंतर रेल्वेने बारा तासापेक्षा कमी वेळेचे अंतर नाही; तर रस्ता मार्गे ते आणखी अधिक होते. त्यामुळे नागपूर ते मुंबई या दोन महानगरातील कम्युनिकेशन किंवा दळणवळण लक्षात घेऊन त्यांनी या मार्गाची संकल्पना केली. नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करीत असतानाच काही मूलभूत बाबी देखील आपल्या भाषणातून स्पष्ट केल्या. कोणत्याही प्रकल्पाचा खर्च हा वाढू नये यासाठी तो प्रकल्प वेळेत पूर्ण होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने सांगितली. कोणत्याही प्रकल्पाला विलंब होत असेल तर त्याच्या खर्चातही वाढ होते आणि त्या प्रलंबून बाधित होणाऱ्या व्यक्तींच्याही जीवनावर एक प्रलंबित समस्या कायम राहते त्यामुळे त्या समस्या अधिक काळ तशाच राहू नये यासाठी प्रकल्प वेळेत होणे गरजेचे आहे हे त्यांनी मात्र आपल्या भाषणात ठासून सांगितले. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणातून सिंगापूर दक्षिण कोरिया या देशांची उदाहरणे घेऊन या देशांसारखीच आर्थिक प्रगती आपण सांगायला हवी असा पुनर्रूच्चार केला. अर्थात दक्षिण कोरिया आणि सिंगापूर या दोन्ही देशांना आपण विकसित म्हणत असलो किंवा जगाच्या पाठीवरती विकसित असले तरी त्यांची अर्थव्यवस्था ही अतिशय चिमुकली आहे. त्यामुळे जगातील तरुणांचा किंवा एका देशातून दुसऱ्या देशात रोजगार किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या तरुणांचा ओढा या देशांकडे मात्र कधीही असल्याचे दिसत नाही. जगातील तरुणांना आकर्षण आहे ते युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांचे. याचे कारण तेथील आर्थिक विकास, जीवनशैली आणि मानवी जीवनाचे मूल्य या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. अर्थात युरोपीय देशांचा जो विकास आहे तो लोकशाही मार्गानेच अवलंबलेला असा आहे लोकशाही मार्गाने विकास करताना देखील जनतेच्या समस्या त्यांची जीवनमूल्य हे जर अधिक संवेदनशील पणे समजून घेतले तर कोणताही अडथळा उभा राहत नाही, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चितपणे लक्षात घेण्यासारखी आहे. समृद्धी महामार्गामध्ये जवळपास न‌ऊ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली. अर्थात ही जमीन देण्यासाठी शेतकरी तयार होता, असे नाही. परंतु, जमिनीचा सातबारा नावावर असला तरी जमिनीची मालकी ही अंतिम असत नाही. ती अंतिमतः सरकारच्या निर्णयावर अवलंबून असते.  समृद्धी महामार्गाला अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला हा तुलनेने यापूर्वीच्या अधिग्रहित जमीनी पेक्षा शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक मिळाला; परंतु, शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणारी जमीनच जेव्हा अधिग्रहित होते त्यावेळी निश्चितपणे एक आक्रोश उभा राहतो आणि हा आक्रोश करणाऱ्या किंवा बाधित असणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा किती प्रकर्षाने सोडवला गेला ही बाब देखील तेवढीच महत्त्व असते. चकाचक असणाऱ्या समृद्धी महामार्गाला राज्यातील जवळपास चारशे गावी जोडली गेली आहेत. परंतु, या  गावांना या महामार्गाचा नेमका लाभ कोणता असेल हे, कृषी समृद्धीचे धोरण ठरविणारांनी निश्चितपणे सांगायला हवे. अर्थात नागपूर ते मुंबई या महाराष्ट्राच्या दोन टोकांवरच्या महानगरांच्या जोडणारा प्रवास जो रस्ते मार्गे १६ तास आणि रेल्वे मार्गे जवळपास १४ ते १५ तास होता; तो अवघ्या आठ तासांवर येऊन ठेपणार आहे. अर्थात नागपूर ते मुंबई या पूर्ण सातशे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे दुसऱ्या टप्प्याचे काम म्हणजे शिर्डी ते मुंबई हे अजून बाकी आहे. हा टप्पा जवळपास दोनशे किलोमीटरचा असणार आहे. अतिशय चकाचक असणाऱ्या या महामार्गावर येणारी खेडी देखील याच महामार्गासारखी चकचकीत होवोत, ही अपेक्षा.

COMMENTS