Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणी व्यंकनाथ येथे बिबट्यांचा धुमाकूळ ; पिंजरा लावण्याची शेतकर्‍यांची मागणी

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला असून; अल्पभूधारक शेतकरी बाळासाहेब श्रावण न

वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ
वेगात वाहने चालवणार्‍या दोघांना दणका, गुन्हे दाखल
आईचा गर्भ आणि कबर दोनच ठिकाण सुरक्षित | DAINIK LOKMNTHAN

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला असून; अल्पभूधारक शेतकरी बाळासाहेब श्रावण नेटवटे यांच्या एका शेळीचा सदर बिबट्याने बळी घेतला आहे. या बिबट्याच्या दहशतीमुळे वाड्या वस्त्यांवर ग्रामस्थ व शेतकर्‍यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन-चार दिवसापूर्वी लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी नेटवटे यांच्या वस्तीवरील शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून सदर शेळीचा बळी घेतला आहे. गेल्यावर्षी याच वस्तीवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्यांचा बळी घेतला होता आता पुन्हा याच शेतकर्‍याच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार लोणी व्यंकनाथ शिवारात अनेक बिबट्यांचा वावर सुरू असून; रात्री अपरात्री वस्त्यांवरील जनावरांवर सदर बिबटे हल्ला करून बळी घेत आहेत. विशेष म्हणजे सध्या शेतकरी मजुरांसमवेत कापूस वेचणीला सुरुवात करत आहेत. अशा परिस्थितीत बिबट्याने या लोणी व्यंकनाच्या शिवारात धुमाकूळ घातल्याने शेतमजूर देखील शेती कामाचे धाडस करत नाहीत. शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार बिबट्याचा लोणी व्यंकनाथ शिवारात अनेक वर्षापासून वावर आहे. त्याचे ठसे देखील वारंवार शेतकर्‍यांना दिसतात. रात्री अपरात्री शेतकरी भरणे करीत असताना अचानक सदर शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार लोणी व्यंकनाथ शिवारात वन कर्मचार्‍यांकडून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासन नियमानुसार वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे. दरम्यान संबंधित लोणी व्यंकनाथचे नुकसानग्रस्त शेतकरी बाळासाहेब नेटवटे यांनी पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना बिबट्याच्या घटनेची बातमी देताच पत्रकार कुरुमकर यांनी संबंधित वन विभागाच्या अधिकार्‍यांना घटनास्थळी बिबट्याची माहिती घेऊन तात्काळ पिंजरा लावण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी श्री शिंदे यांनी नेटवटे यांच्या वस्तीवर जाऊन ज्या ठिकाणी बिबट्याने शेळीवर हल्ला केला तेथील जागेचा पंचनामा केला आहे. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी बाळासाहेब नेटवटे व त्यांचे कुटुंब यावेळी उपस्थित होते. काही शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार उसाच्या शेतामध्ये बिबट्या वास्तव्य करत असून; मध्यरात्री बिबटे भक्षणासाठी शेतकर्‍यांच्या शेळी व गायींच्या गोठ्यांमध्ये जाऊन त्यांचा बळी घेत आहेत. परंतु अशा परिस्थितीत जर शेतकरी त्या बिबट्यावर प्रतिकार करण्यासाठी गेला तर त्या शेतकर्‍यांवर देखील बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता असल्याने संबंधित वन विभागाचे अधिकार्‍यांनी तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

COMMENTS