Homeताज्या बातम्यासंपादकीय

कुलकर्णीची चमकेशगिरी पत्रकारिता !

 तमाशा, जलसा या महाराष्ट्रात प्रबोधनाच्या चळवळी म्हणून गणल्या गेल्या आहेत. किंबहुना, याच कला प्रकाराच्या माध्यमातून समाजात संत विचार, फुले-शाहू-आ

सत्ताकारणाचा केंद्रबिंदू माणूसच असावा ! 
सरकार आणि न्यायपालिका ! 
शरद पवारांचे संशयास्पद राजकारण!

 तमाशा, जलसा या महाराष्ट्रात प्रबोधनाच्या चळवळी म्हणून गणल्या गेल्या आहेत. किंबहुना, याच कला प्रकाराच्या माध्यमातून समाजात संत विचार, फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार पोहचले. वस्तुतः गीत, वग आणि नृत्य त्याचबरोबर हजरजबाबी विनोद या कला प्रकारातून प्रबोधन सादर केले जाएचे. याच कलांना आधुनिक प्रकारात आणून करोडोंची कमाई करणारा एक वर्ग आज निर्माण झाला आहे. कपिल शर्मा सारखे शेकडो स्टॅंड‌अप काॅमेडियन तमाशातील सोंगाड्या या पात्रातून प्रेरणा घेत सेलिब्रिटी बनले. लावणी नृत्य महाराष्ट्रात सादर करणाऱ्या कलावंतांना घरघर लागली असताना त्याच कला टीव्ही आणि चित्रपटांत करोडोंची कमाई करणारे सेलिब्रिटी निर्माण करित आहेत. यातील वग नाट्य या प्रकाराने आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले अस्तित्व आणले आहे. अशा या महान कलांची माहिती नसलेला एक राहुल कुलकर्णी नावाचा पत्रकार या सर्व प्रकारांची संभावना डान्स बार म्हणून करतो, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. वास्तविक, सुरेखा पुणेकर सारख्या एका महान लोककलाकाराची मुलाखत घेण्याच्या नावाखाली तमाशाला डान्स बार म्हणणारा राहुल कुलकर्णी गंधर्व नाट्यमंदिरात सादर केल्या जाणाऱ्या कलांनाच महान म्हणतो आहे, ही सांस्कृतिक अवनती झालेला हा पत्रकार आपली पारंपरिक मानसिकता पुढे रेटताना दिसतो आहे. वास्तविक, तमाशा, जलसा, वगनाट्य, सोंगाड्या, लावणी, गण-गवळण, पोवाडा या तमाशातील सादरीकरण केल्या जाणाऱ्या कोणत्याही कला प्रकाराची माहिती नसताना केवळ पोपटपंची मुलाखत घेणे म्हणजे पत्रकारिता करणे नव्हे. आज आधुनिक काळात प्रत्येक पारंपरिक बाबीला एका कठीण प्रसंगातून जावे लागते आहे. सर्व कलाप्रकार आधुनिक सादरीकरणात मार्केट व्हॅल्यू बनले आहेत. परंतु, त्याच परंपरागत कलाकारांची माहिती घेऊन त्यांचे प्रश्न समाज आणि शासनासमोर मांडण्याऐवजी त्या प्रश्नांची हेळसांड करणारी मुलाखत घेणं म्हणजे महानता आहे काय? महाराष्ट्र हा आजही यात्रा महोत्सवासाठी ओळखला जातो. यात्रा म्हटली की, आजही प्रत्येक यात्रेचे गाव आणि गावकरी मंडळी हक्काचा तमाशा गावात आणतात. गावाची जेष्ठ आणि पंचमंडळ आपल्या गावाच्या यात्रेत यावर्षी कोणता तमाशा आणायचा याची चर्चा गावातील प्रमुखांशी करून जिल्ह्याच्या गावी जावून तमाशा ठरवतात. आधुनिक काळात मनोरंजनाचे अनेक प्रकार असताना ही गावात तमाशा निमंत्रित केला जातो; यावरून आधुनिक पिढी असलेले तरूणही यात सहभागी होतात, हे स्पष्ट होते. परंतु, याची कोणतीही जाण किंवा माहिती कुलकर्णी नावाच्या पत्रकाराला दिसत नाही; मात्र, त्यांचा दावा आहे की, मी ग्रामीण भागात हे सर्व पाहिले आहे. या संस्कृतीची माहिती असल्याचे त्यांच्या कोणत्याही प्रश्नातून निदर्शनास येत नाही. भक्ती, नैतिकता, ज्ञान, मनोरंजन आणि मानवतेचे संस्कार या मूल्यांना घेऊन तमाशा हा कलाप्रकार १७ व्या शतकापासून सादर होत आहे. १९ व्या शतकाता त्याची मूल्य अजून प्रागतिक झाली. बहुजन कलाप्रकार बदनाम करण्याचा जो प्रघात रूजला आहे, त्याची री ओढण्याची सवय आणि मानसिकता राहुल कुलकर्णी नावाचा पत्रकार एकदा पुन्हा अभिव्यक्त करताना दिसतो. वास्तविक, एखाद्या तमाशा कलाकाराची मुलाखत घ्यायचीच असेल तर ती प्रत्यक्ष तमाशा फडात जावून घेतली पाहिजे, हा संकेत आहे. मात्र, तारांकित थियेटर मध्ये जावून तमाशावर मुलाखत घेणं हा कोणता संकेत म्हणता येईल. आपल्या ज्ञान पाजळण्याच्या सवयीने मुलाखती घेणे हाच उद्देश असेल तर ती कुलकर्णी नावाच्या पत्रकाराची चमकेशगिरी म्हणावी लागेल!

COMMENTS